पुणे : Maharashtra Weather Forecast पावसाळापूर्व कामाअंतर्गत नालेसफाई, पावसाळी वाहिन्या आणि गटारे तसेच चेंबरच्या साफसफाईची कामे पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा पहिल्याच जोरदार पावसात फोल ठरला. पावसाचे पाणी वाहून न गेल्याने अनेक रस्त्यांवर पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. तसेच रस्त्यांची दुरवस्था आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना पुढे आल्या.
पावसाळापूर्व कामाअंतर्गत महापालिकेच्या वतीने दरवर्षी नाले, ओढ्यांची साफसफाई केली जाते. तसेच पावसाळी वाहिन्या, गटारे, पावसाळी झाकणे, चेंबर आणि कल्व्हर्ट स्वच्छतेची कामेही केली जातात. यंदा ही कामे एप्रिल महिन्यापासून हाती घेण्यात आली. मात्र त्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. पंधरा जून रोजी महापालिका आयुक्त प्रशासक विक्रम कुमार यांनी नालेसफाईची कामे शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात फोल ठरला.
हेही वाचा >>> पुणे : पाच दिवस बरसणार जलधारा!, ‘या’ भागात होणार संततधार
शहराच्या अनेक भागांत चेंबर, सांडपाणी वाहिन्या तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. बहुतांश ठिकाणी चेंबरमधून रस्त्यावर पाणी आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. मेट्रो मार्गिकांच्या कामांमुळेही अनेक रस्त्यांवर पाणी साचून राहिले. तसेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते खोदाई करून ठेवल्याचे, रस्त्यांवर टाकलेला राडारोडा यांमुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. रस्ते आणि पदपथांवर पाणी साचल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागले.