पुणे/पिंपरी : आळंदी येथील इंद्रायणी नदीतील पाण्यावर जलप्रदूषणामुळे पुन्हा मोठय़ा प्रमाणात तवंग आले. त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले असून, नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. इंद्रायणी नदीचा उगम लोणावळा परिसरातून झाला आहे. ही नदी अनेक गावे, शहर पार करत आळंदीतून पुढे वाहत जाते. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहती, इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी, गावांमधील मैलायुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. मैलायुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. शुक्रवारी रात्री आळंदी परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर नदीतील पाण्यावर मोठय़ा प्रमाणात तवंग आले.
इंद्रायणी नदी पात्रात लाखो वारकरी मोठय़ा श्रद्धेने स्नान करून माऊलींचे दर्शन घेतात. परंतु, नदीची अवस्था बघता लाखो वारकऱ्यांचे आणि आळंदीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच जलपर्णीने इंद्रायणीचा श्वास गुदमरत आहे. आता त्यात जलप्रदूषणाची भर पडली असून अवघ्या नदी पात्रात तवंग दिसत आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्यानेच नदीची अशी अवस्था झाल्याची चर्चा आहे.दैनंदिन वापरातील ६० ते ६५ दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी प्रतिदिन कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नदीत घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी, मैला सोडल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. जिल्हा प्रशासन, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ५७७.१६ कोटी रुपयांचा नदीसुधार प्रकल्प तयार केला असून, राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने तो स्वीकारला आहे. मात्र, हा प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
पवना, इंद्रायणी नद्यांची दुरवस्था झाली आहे. उद्योजक, गृहनिर्माण संस्थांमधील मैलामिश्रित पाणी थेट नदीत सोडले जाते. नद्या प्रदूषित करणाऱ्या कंपन्या, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी. – मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते