देशोदेशीच्या स्थलांतरित पक्ष्यांचे उजनी धरणातील सर्वात मोठे आश्रयस्थान जल प्रदूषणाच्या विषारी विळख्यात सापडले आहे. उजनी जलाशयाच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या आश्रयाला लाखोंच्या संख्येने आलेल्या स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. सध्या धरणातील पाण्याची प्रदूषण पातळी वाढल्याने पाण्याचा रंग हिरवा गर्द झाला आहे. जलाशयाच्या पाण्याला उग्र वास येत असून या पाण्यात वावर करत असलेले मच्छीमार आणि शेतकरी या पाण्यामुळे अंगाला खाज येत असल्याची तक्रार करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुण्यातील स्वीकृत नगरसेवकांची संख्या दहावर

गेल्या ४० वर्षांच्या इतिहासात डिसेंबरअखेर आणि जानेवारी महिन्यात सर्वाधिक १०० टक्के जलसाठा उजनी धरणात आहे. दरवर्षी देशोदेशींच्या सीमा ओलांडून उजनीच्या जलाशयातील जैववैविध्यावर पोटापाण्याची सोय करण्यासाठी विणीच्या हंगामासाठी पाहुणे पक्षी येतात. सध्या उजनी धरणावर रोहित, चित्रबलाक, विविध करकोचे, पट्टकदंब, राखी बगळे, मोरघार, तपकिरी डोक्याचा करकोचा अशा विविध जाती प्रजातीच्या पक्ष्यांनी आणि त्यांच्या गजबजाटाने उजनीचा परिसर खुलला आहे. पर्यटक, हौशी छायाचित्रकार, अभ्यासक, विद्यार्थी व निसर्गप्रेमींची पावले उजनीकडे वळत आहेत. उजनी धरण परिसर पर्यटनासाठी एक आकर्षक केंद्र होत असतानाच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पक्ष्यांच्या अधिवास प्रवण भागालाच प्रदूषित पाण्याचा विषारी विळखा पडला आहे.

हेही वाचा- राज्य गारठले; उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा

उजनी धरणाच्या पाण्यामध्ये प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पर्यावरणासह या परिसरात वावरणाऱ्या नागरिकांनाही धोका निर्माण झाला आहे. सन १९७८-७९ च्या दरम्यान उजनी धरणात पाणी अडविण्यास प्रारंभ केल्यानंतर सुरवातीचे चार-पाच वर्षे परिसरातील शेतकरी, नागरिक, मच्छीमार उजनी धरणाचे कच्चे पाणी पिण्यासाठी वापरत होते. मात्र, आज या पाण्याचा संपर्क आल्यानंतर शरीराला खाज सुटते. या परिसरातील जमिनी क्षारयुक्त, नापीक होत आहेत. पाण्यातील रासायनिक घटक एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत असल्याने याचा दूरगामी परिणाम होणार आहे. शासनाने उजनीच्या प्रदूषणाबाबत तातडीने उपाययोजना करावी, असे प्रा.भास्कर गटकुळ यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water pollution in ujani dam at dangerous level psg 17 pune print news dpj