लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढून पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या आंद्रा धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसरांत पाणी कमी झाल्याने थेट नळाला विद्युत पंप जोडून पाणी उचलण्याचे प्रकार होत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने असे २५ पंप जप्त केले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहरातील तापमानाचा पारा चाळिशीपार गेल्यामुळे पाण्याच्या मागणीत वाढू होऊ लागली आहे. त्यातच आंद्रा धरणातून येणारे पाणी कमी झाल्याने समाविष्ट गावांसह उपनगरांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होऊ लागली आहे.
वाकड, पिंपळे गुरव, चिखली, मोशी, चऱ्होली, दिघी, भोसरी, डुडुळगाव, थेरगाव, दापोडी, काळेवाडी, किवळे, वाल्हेकरवाडीसह शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याच्या आणि अपुरा व अवेळी पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. परिणामी, काही रहिवासी दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर पाणी नेण्यासाठी महापालिकेच्या नळजोडाला अनधिकृतपणे इलेक्ट्रिक विद्युत पंप लावून मोठ्या प्रमाणात पाणी उपसत आहेत. त्यामुळे परिसरातील इतर नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन त्यांच्याकडून तक्रारी येऊ लागल्या असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशा प्रकारे पाणी उचलण्याचा प्रयत्न करण्यासाठी पिंपळे गुरव परिसरात लावण्यात आलेले २५ पंप जप्त करण्याची कारवाई पाणीपुरवठा विभागाने केली. शहरातील इतर भागांतही पाणी ओढणारे पंप जप्त करण्यात येणार आहेत. ‘नळजोडाला थेट विद्युत पंप लावू नये. कोणत्याही खासगी प्लंबरद्वारे अनधिकृत नळ जोडून घेऊ नये,’ असे आवाहन महापालिकेने केले आहे.
वाहन धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई
शहरात वॉशिंग सेंटरची संख्या मोठी आहे. यामधील काही वॉशिंग सेंटरचालक बोअरवेलचे, तर काही चालक व्यावसायिक नळजोड घेऊन वाहन धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरतात. काही वॉशिंग सेंटरचालक अनधिकृत नळजोड घेऊन पिण्याचे पाणी वापरत असल्याचे आढळून आले आहे. वॉशिंग सेंटरचालकांनी पिण्याचे पाणी वाहने धुण्यासाठी वापरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
पाण्याची मागणी वाढली आहे. नागरिकांनी वाहन धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, तसेच अंगणामध्ये, रस्त्यावर पिण्याचे पाणी शिंपडणे टाळावे. जास्त पाणी मिळावे, म्हणून काही नागरिक महापालिकेच्या नळजोडाला थेट विद्युत पंप लावून पाणीउपसा करतात. अशा नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे. पिंपळे गुरव भागात २५ पंप जप्त केले आहेत. वाॅशिंग सेंटरचालकांनी पिण्याचे पाणी वाहन धुण्यासाठी वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. -अजय सूर्यवंशी, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका