भाजपवगळता सर्व पक्षांचा विरोध असतानाही आणि पुणेकरांनीही अनेक प्रश्न उपस्थित केलेले असताना बुधवारी सकाळी खडकवासला प्रकल्पाच्या कालव्यातून दौंड आणि इंदापूरसाठी पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून या निर्णयामुळे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीका करण्यात येते आहे. काल मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी या निर्णयाविरोधात जलसंपदा विभागाच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड केली होती. तर बुधवारी शिवसेनेने पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिराजवळ घंटानाद आंदोलन केले. पालकमंत्र्यांना सुबुद्धि दे अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून गणरायाकडे करण्यात आली.
पाणी पळवा..
दौंडला पिण्यासाठी अर्धा टीएमसी (अब्ज घनफूट) पाणी खडकवासला धरणातून सोडण्याची तयारी पालिकेतील गटनेत्यांनी दाखविली असतानाही या सर्वाना झुगारून लावत पालकमंत्री गिरीश बापट यांनी दौंडसह इंदापूरला एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला. इंदापूरला कालव्यातून पाणी सोडूनही ते पोहोचणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे असतानाही इंदापूरला पाणी सोडण्याचा खटाटोप केला जात आहे. पालकमंत्र्यांच्या या अट्टाहासामुळे आठ महिन्यांपासून कपात करून वाचविलेल्या पाण्यावर गदा येणार असून, पुणेकरांना आणखी पाणी कपातीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दौंडला पिण्यासाठीच पाणी हवे असेल, तर कालव्याऐवजी टँकर किंवा रेल्वेने पाणी पुरविण्याचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली होती. पण त्याचा विचार करण्यात आला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा