लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : जलसंपदा विभागाकडून पाणी घेणाऱ्या पुणे महापालिकेने जलसंपदा विभागाची ७२६ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी तातडीने भरावी अन्यथा शहराचे पाणी बंद केले जाईल, असा इशारा जलसंपदा विभागाने दिल्याने महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मात्र, पाणीपट्टीची थकबाकी १६० कोटी रुपये असून, नियमितपणे पाणीपट्टी भरण्यात येत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

जलसंपदा विभागाने आकारलेल्या पाणीपट्टीविरोधात महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे याचिका दाखल असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे.

पुणे शहरातील नागरिकांना पाणी देण्यासाठी पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाच्या वतीने खडकवासला, भामा आसखेड या धरणातून पाणी दिले जाते. शहराची वाढलेली हद्द व वाढणारी लोकसंख्या यामुळे महापालिकेला मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी धरणातून घ्यावे लागत आहे. त्यामुळे महापालिका अतिरिक्त पाणीपट्टीदेखील भरत आहे. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये पाणीपट्टीच्या आकारणीवरून जोरदार वाद निर्माण झालेला आहे.

महापालिका नागरिकांना पाणी देत असतानाही ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी वापरल्याने जलसंपदा विभाग औद्योगिक दराने पाण्याचे बिल महापालिकेला देत आहे. त्यामुळे महापालिकेला दीडशे ते दोनशे कोटी रुपये येणारे बिल सातशे कोटींच्या घरात गेले आहे.

शहरात एकही प्रक्रिया उद्योग नसताना जलसंपदा विभागाने त्याची पाणीपट्टी वसूल करण्यासाठी महापालिकेला बिल दिले आहे. तसेच व्यावसायिक वापर १५ टक्के दाखवला आहे. सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात असल्याने लावण्यात आलेला दंड यासह अन्य कारणांनी जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणीपट्टी पाठवली आहे. त्याची थकबाकी ७२६ कोटी रुपयांवर पोचली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये बैठका झाल्या, पण निर्णय झालेला नाही. त्यामुळे महापालिकेने लवादात याचिका दाखल केली आहे.

पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, पाणी वापराबाबत जलसंपदा विभागाने आकारलेल्या पाणीपट्टीबाबत महापालिकेची हरकत आहे. त्यावर महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. नियमित पाणीपट्टी १६० कोटी रुपये असून, ही रक्कम महापालिकेतर्फे भरली जाईल.

खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिक्षक श्वेता कुऱ्हाडे म्हणाल्या, महापालिकेकडे थकबाकी आहे. त्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अद्यापही ती देण्यात आली नाही. त्यामुळे महापालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे. थकबाकी न भरल्यास २५ फेब्रुवारीपासून पाणीकपात केली जाईल.