ग्रामीण भागातील सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणाऱ्या मुंढवा जॅकवेल प्रकल्पातील बेबी कालव्याची दुरवस्था झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कालवा बुजविण्याचे, कालव्यावर बांधकामे करण्याचे आणि कच्चा रस्ता करण्यात आल्याचे वास्तव पुढे आले असून पाणीवापरावरून पुणेकरांवर ताशेरे ओढणाऱ्या जलसंपदा विभागाची ही निष्क्रियता पालकमंत्र्यांना का दिसत नाही, अशी विचारणा सध्या करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील शेतीसाठी प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी बेबी कालव्याच्या माध्यमातून सोडण्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च करून महापालिकेने मुंढवा जॅकवेल प्रकल्पाची उभारणी केली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा गतवर्षी पेक्षा कमी असल्यामुळे प्रतीदिन १३५० दशलक्ष लिटर पाण्याऐवजी ११५० दशलक्ष लिटर पाणी महापालिकेने घ्यावे, असा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत झाला आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करताना मुंढवा जॅकवेलच्या माध्यमातून प्रक्रिया केलेल्या साडेसह अब्जू घनफूट (टीएमसी) पाण्याचा हिशोब गृहीत धरला जात नसल्याचे पुढे आले असतानाच बेबी कालव्याचीही दुरुवस्था झाल्याची बाब सजग नागरिक मंचाच्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीतून पुढे आली आहे. त्याबाबतची माहिती सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी दिली.

जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असलेल्या बेबी कालव्याची अनेक वर्षे देखभाल दुरुस्तीच झालेली नाही. मुंढवा जॅकवेल ते केडगांवपर्यंत पाहणी केल्यानंतर ही वस्तुस्थिती पुढे आली. यवतपासून पाच किलोमीटर अंतरावर खुडबाव येथे दगडमातीमुळे कालवा बुजला गेला आहे. तर, केडगवांच्या अलीकडे कालव्यावर भराव टाकून कच्चा रस्ता बांधण्यात आला आहे. काही ठिकाणी कालव्यावर बांधकामेही झाली आहेत. जलसंपदा विभागाकडून त्याकडे डोळेझाक होत आहे, असे विवेक वेलणकर यांनी सांगितले.

जलसंपदाकडून धरणातील पाण्याचा अपव्यय

शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी सिंचनासाठी देता यावे यासाठी मुंढवा जॅकवेल प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. दररोज ५५० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प आहे. मात्र, प्रतीदिन सरासरी ३७० दशलक्ष लिटर पाणी जलसंपदा विभागाने गेल्या २२ दिवसांमध्ये घेतले आहे. तर गेल्या दोन वर्षांत साडेसहा अब्ज घनफूट पाणी घेण्यात आले आहे. प्रक्रिया केलेले साडेसहा अब्जू घनफूट पाणी उपलब्ध असतानाही ते न घेता धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्यामुळे जलसंपदा धरणातील पाण्याचा अपव्यय करीत असल्याचे यापूर्वीच पुढे आले होते.