शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील रेव्हेन्यू कॉलनीत गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी रविवारी महापौर बंगल्यापुढे आंदोलन केले. पाणी देत येत नसेल तर मतही देणार नाही, पाणीटंचाईच्या निषेधार्थ रस्ता अडवण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिल्यानंतर पाणीपुरवठा नियमित करण्याचे लेखी आश्वासन महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांना द्यावे लागले. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर ही वेळ आल्यामुळे राजकीय वर्तुळातही त्यावरून चर्चा सुरू झाली.

शहरातील पाणीपुरवठय़ाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. दहा दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस वसाहतीमधील नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना घेराव घातला होता. त्यानंतर या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने दिले होते. मात्र रेव्हेन्यू कॉलनीतील पाणीपुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. त्याबाबत सातत्याने तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांच्या संतापाचा रविवारी उद्रेक झाला. डेक्कन जिमखाना, घोले रस्ता, रेव्हेन्यू कॉलनी, घोले रस्ता या परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठय़ाच्या नियोजनाबाबत महापौर बंगल्यावर बैठक सुरू असतानाच बादली, हंडे आणत महापौर बंगल्यापुढे घोषणाबाजी केली.

पाणीपुरवठा तीन नोव्हेंबपर्यंत सुरळीत होईल, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त सौरभ राव यांनी दिले. मात्र तोंडी आश्वासन नको, लेखी द्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. त्यामुळे अखेर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे लिहून देण्याची वेळ महापौरांवर आली. दरम्यान, तीन नोव्हेंबपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

पाणीपुरवठय़ासंदर्भात खासदारांची नाराजी

पाण्याचे नियोजन करण्यात आलेले अपयश आणि विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठय़ाच्या पाश्र्वभूमीवर खासदार अनिल शिरोळे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने असा इशारा दिल्यामुळे त्याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली होती. त्यामुळे पाण्याच्या नियोजनासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिल्यानंतर शिरोळे यांनी उपोषणास्त्र म्यान केले होते. त्यानंतर रविवारी झालेल्या बैठकीही त्यांनी पाणीपुरवठय़ावरून जोरदार टीका केली. शिवाजीनगर मतदार संघात कोथरूड विधानसभा मतदार संघापेक्षा कमी पाणी येते. अधिकारी दूरध्वनी उचलत नाहीत. पाणी सोडण्यासाठी कर्मचारी पैसे घेतात, असे आरोप शिरोळे यांनी केले. शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आली असली, तरी सर्वाना योग्य प्रकारे पाणी देण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे, असेही ते म्हणाले. सर्व भागाला योग्य प्रकारे पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने वेळापत्रक करण्यात आले आहे. कोथरूड आणि शिवाजीनगर हे दोन मोठे भाग आहेत. त्यांना योग्य प्रकारे पाणी मिळावे असे नियोजन करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकाची चाचणी सुरू असताना शिवाजीनगर परिसरात तांत्रिक अडथळ्यांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. तांत्रिक अडचणी दूर करून योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी अधिकाऱ्यांनी दिले.