कालवा सल्लागार समितीची मुंबईत बैठक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मापदंडापेक्षा अधिक पाणी उचलणाऱ्या महापालिकेला प्रतिदिन ११५० दशलक्ष लिटर (एमएलडी) की, त्यापेक्षा अधिक पाणी द्यायचे याचा फैसला सोमवारी (२६ नोव्हेंबर) मुंबईत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. या बैठकीला जलसंपदा विभाग, महानगरपालिकेचे अधिकारी, शहराचे आमदार, जिल्ह्य़ातील खासदार आणि पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत.

कालवा सल्लागार समितीच्या ऑक्टोबरमधील बैठकीच्या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेच्या मागणीनुसार दिवाळीनंतर करण्यात येणार होती. परंतु, दिवाळीनंतरही मापदंडापेक्षा अधिक पाणी घेणाऱ्या महापालिकेला दणका देत जलसंपदा विभागाकडून २२ नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजता पर्वती जलवाहिनीचा एक पंप बंद करण्यात आला. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दूरध्वनी करून दोन दिवसांची मुदत मागितली. त्यानुसार महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दूरध्वनी करून दोन दिवस कारवाई करू नका, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंप सुरू करून महापालिकेचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

या सर्व पाश्र्वभूमीवर सोमवारी (२६ नोव्हेंबर) मंत्रालयात दुपारी तीन वाजता कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये पूर्वनियोजनानुसार प्रतिदिन ११५० दशलक्ष लिटर पाणी महपालिकेने घ्यावे, हा मुद्दा जलसंपदा विभागाकडून मांडला जाणार आहे, असे खडकवासला पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन घेतील. त्यानुसार कार्यवाही करू, असेही शेलार यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे महापालिकेकडून प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी देण्याबाबतची मागणी शहराचे लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे शहराला नेमके किती पाणी मिळणार, याचा फैसला सोमवारी होणाऱ्या बैठकीतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity in pune
Show comments