पुणे : भामा-आसखेड पंपिंग आणि जॅकवेलमधील तांत्रिक बिघाडामुळे शहराच्या पूर्व भागाला गेले दोन दिवस पाणीबाणीचा सामना करावा लागला. पंपिंग स्टेशनमधील केबल तुटल्याने बुधवार आणि गुरुवारी पूर्व भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सलग दोन दिवस पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली.
वडगावशेरी, कळस, धानोरी, विश्रांतवाडी, फुलेनगर, चंदननगर या पूर्व भागाला भामा-आसखेड धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पूर्व भागातील अपुरा आणि विस्कळीत पाणीपुरवठा लक्षात घेऊन या भागाला भामा-आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र भामा-आसखेड धरणातून या भागाला पाणीपुरवठा होत असला तरी वारंवार बिघाडामुळे या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या सातत्याने कामय राहिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे या भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
भामा-आसखेड पंपिंग आणि जॅकवेल युनिटमधील केबल तुटल्याने या भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन २०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याची आहे. पूर्व भागाची लोकसंख्या २०४१ मध्ये १४ लाख ५० हजार होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने त्यासाठी निधी दिला आहे. मात्र त्यानंतरही पूर्व भागाला सातत्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.
हेही वाचा… पिंपरी-चिंचवड महापालिकेत ६७१ कोटींचा ‘टीडीआर’ घोटाळा; आयुक्तांसह…
पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप म्हणाले, की भामा-आसखेड पंपिंगमध्ये केबल तुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. गुरुवारी रात्रीपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्यासंदर्भात कोणत्याही तक्रारी नाहीत.