लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : अपवाद वगळता देशाच्या बहुतांश भागांत मार्चच्या मध्यातच पाणी टंचाई तीव्र झाली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, बिहार, नागालँड ही राज्ये भीषण टंचाईचा सामना करीत आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाड्यात टंचाईची स्थिती आहे. वाढत्या उन्हाच्या चटक्यांसोबत टंचाईच्या झळाही वाढणार असल्यामुळे उपलब्ध जलसाठा जूनअखेर पुरवून वापरण्याचे आव्हान आहे.
केंद्रीय जल आयोगाने देशातील प्रमुख १५० जलसाठ्यांतील पाण्याचा आढावा घेतला आहे. त्यानुसार दक्षिण भारतात केरळ वगळता सर्वत्र भीषण पाणी टंचाई आहे. तेलंगणातील प्रमुख सात धरणांनी तळ गाठला असून, धरणांत केवळ ३५ टक्के पाणी आहे. आंध्र प्रदेशातील चार धरणांत जेमतेम तेरा टक्के पाणी आहे. कर्नाटकातील १६ धरणांत २६ टक्के पाणीसाठा आहे. तमिळनाडूतील सात धरणांत ३० टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. मागील दहा वर्षांच्या सरासरी जलसाठ्याचा विचार करता, आंध्र प्रदेशात ६८ टक्के, तेलंगणात १० टक्के, कर्नाटकात २६ आणि तमिळनाडूत २७ टक्के कमी पाणीसाठा आहे.
आणखी वाचा- निवडणुकीमुळे ‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर
मध्य भारताचा विचार करता, उत्तर प्रदेशातील प्रमुख आठ जलाशयात २३ टक्के, उत्तराखंडच्या तीन जलाशयात ४३ टक्के, मध्य प्रदेशच्या अकरा जलाशयात ५४ टक्के, छत्तीसगडच्या चार जलाशयात ४९ टक्के पाणी शिल्लक आहे. मागील दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत उत्तर प्रदेशात २५ टक्के आणि छत्तीसगडमध्ये २२ टक्के कमी पाणीसाठा आहे.
पूर्व भारताचा विचार करता, बिहारमध्ये पाणी टंचाई भीषण असून, बिहारमधील धरणात जेमतेम दहा टक्के पाणीसाठा आहे. मागील दहा वर्षांच्या तुलनेत बिहारमध्ये ५९ टक्के कमी पाणीसाठा आहे. नागालँडमध्ये १४ टक्के, पश्चिम बंगालमध्ये १९ टक्के कमी पाणीसाठा आहे.
महाराष्ट्रात अकरा टक्के कमी पाणीसाठा
केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ३२ प्रमुख धरणांत सद्यस्थितीला ४४ टक्के पाणीसाठा आहे. मागील दहा वर्षांच्या सरासरी पाणीसाठ्याचा विचार करता राज्यात अकरा टक्के कमी पाणीसाठा आहे. जायकवाडीत २४ टक्के, उजनीत शून्य टक्के, गिरणात ३२ टक्के, माणिकहोडमध्ये २३ टक्के, कण्हेरमध्ये ३५ टक्के, दारणा धरणात २८ टक्के, येलदरी धरणात ४१ पाणीसाठा आहे. प्रामुख्याने मराठवाड्यात पाणी टंचाई गंभीर झाली आहे. राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे टंचाईची तीव्रता कमी झाली आहे.
आणखी वाचा- पुण्यातील दहा हजार गुंड रडारवर; १६ संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष
राज्यनिहाय धरणांतील पाणीसाठा
(दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेतील घट)
आंध्र प्रदेश – ६८ टक्के
बिहार – ५९ टक्के
तमिळनाडू – २७ टक्के
कर्नाटक – २६ टक्के
उत्तर प्रदेश – २५ टक्के
छत्तीसगड – २२ टक्के
नागालँड – १४ टक्के
महाराष्ट्र – ११ टक्के
तेलंगणा – १० टक्के