पुणे/इंदापूर : सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या बंद जलवाहिनी योजनेचे काम रखडल्याचा परिणाम उजनी धरणातील पाणीसाठ्यावर होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाचे कसे होणार, ही चिंता पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना भेडसावण्यास सुरुवात झाली आहे.

सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि भीमा नदीच्या काठावरील पाणीपुरवठा योजनांसाठी उजनीतून भीमा नदीत आवर्तन सोडले जाते. एका आवर्तनाला किमान साडेपाच टीएमसी पाणी लागते. या प्रकारची दोन आवर्तने सोडली जातात. यामध्ये १२ टीएमसी पाणी नदीपात्रातून सोडण्यात आले आहे. सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी उजनीतून समांतर जलवाहिनीचे काम गेले कित्येक दिवस सुरू आहे. मात्र अजूनही ते काम पूर्णत्वास गेले नसल्याने उजनीच्या पाण्याचा फार मोठा अपव्यय होतो. हे काम रखडल्याने आणखी सहा टीएमसी पाणी सोडावे लागण्याचीही शक्यता आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये उजनी धरण शंभर टक्के भरले होते. या धरणाची क्षमता १११ टीएमसी असून, त्यामध्ये ६३ टक्के मृत साठा आहे. उर्वरित पाण्यातून सोलापूर, तसेच पुणे जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानंतरच धरण पूर्ण क्षमतेने भरते. गेल्या वर्षी तसे ते भरले. उजनीत २६ टीएमसी चलसाठा असून, पाण्याचा वापर योग्य पद्धतीने झाला नाही, तर पाणी कमी पडेल, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावते आहे. त्यातून यंदा पावसाने ओढ दिली, तरीही आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी उजनीतून पाणी सोडावेच लागेल. या पार्श्वभूमीवर, गेल्या वर्षी धरण पूर्ण भरूनही पाण्याची ओरड कायम राहील. म्हणूनच धरणातील पाण्याचे अचूक नियोजन का करण्यात येत नाही, अशी विचारणा शेतकऱ्यांकडून होत आहे.

उजनी धरणातून बेसुमार पाणीउपसा झालेला नाही. ऑक्टोबर महिन्यापासून सोलापूर शहरासासाठी पिण्याच्या पाण्याची दोन आवर्तने सोडली जात आहेत. त्यातून १० ते १२ टीएमसी पाणी सोलापूरला देण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील चलसाठ्यातील ३५ टक्के पाणी कमी झाले आहे. जलवाहिनीच्या कामाचे नियोजन वेळेत पूर्ण न झाल्यास पुन्हा पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.– आर. पी. मोरे, कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग

Story img Loader