पिंपरी-चिंचवड शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा झाल्यानंतर महापालिकेच्या दोन निवडणुका पार पडल्या. मात्र, अद्याप त्याची पूर्तता झाली नाही. उपलब्ध होणारा निधी व पालिकेचे नियोजन पाहता २०२० नंतर ही योजना पूर्णत्वाला येऊ शकणार आहे. आगामी तीन वर्षांत शहरातील ४० टक्के भागात २४ तास पाणी देण्यात येणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. २०१५ पर्यंत होणाऱ्या कामासाठी केंद्र सरकारचे २०६ कोटींचे अनुदान मिळणे अपेक्षित आहे. तथापि, उर्वरित खर्च पालिकेला करावा लागेल, अशी शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या नेहरू अभियानाअंतर्गत शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा पालिकेने केली असून त्यासाठी ४०० कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे. अभियानाची मुदत २०१५ पर्यंतच असल्याने या कालावधीत होणाऱ्या कामाचेच पैसे पालिकेला मिळू शकणार आहेत. त्यामुळे तीन वर्षांत शहरातील ४० टक्के भागात २४ तास पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले असून तशा आशयाचा प्रस्ताव पालिकेने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर याबाबतची अंमलबजावणी होणार आहे. २०१५ नंतर अभियानाचा विस्तार झाल्यास उर्वरित खर्चही पालिकेला मिळू शकतो. मात्र, तसे न झाल्यास तो खर्च पालिकेला टप्प्याटप्प्याने करावा लागणार आहे.
शहरात २४ तास पाणीपुरवठा सुरू करण्यापूर्वी महापालिकेला बऱ्याच गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्याची गळती रोखण्याची प्रभावी यंत्रणा उभारावी लागणार आहे. र्सवकष मीटरपद्धती लागू करणे, जलवाहिन्या बदलणे, घरगुती नळजोड बसवणे आदींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. अन्यथा, या योजनेचा हेतू साध्य होणे अवघड असल्याचे मत अधिकारी व्यक्त करतात. सुरुवातीला उच्चभ्रूंची वसाहत असलेल्या प्राधिकरणात २४ तास पाणी देण्याचा प्रयोग करण्यात आला. मात्र, तो फसला होता. नेहमीपेक्षा खूपच जास्त पाण्याचा वापर तेथे झाला आणि अन्य अडचणी निदर्शनास आल्या होत्या. त्यानंतर सुधारणा करून व खबरदारी घेऊन निगडीतील यमुनानगर प्रभागात पुन्हा प्रयोग करण्यात आला. तेव्हा त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला. आता चिंचवडच्या प्रेमलोक पार्क प्रभागात २४ तास पाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर भौगोलिक व अन्य बाबींचा विचार करून शहरभरातील ४० टक्के परिसराची निवड करण्यात येईल व २०१५ नंतर सरसकट सर्व शहराला २४ पाणी देण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
पिंपरी-चिंचवडला २४ तास पाणीपुरवठा २०२० नंतरच शक्य
उपलब्ध होणारा निधी व पालिकेचे नियोजन पाहता २०२० नंतर पिंपरी-चिंचवड शहराला २४ तास पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाला येऊ शकणार आहे.
First published on: 04-07-2013 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply 24 by 7 to pimpri chinchwad after