पिंपरी : वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणीही वाढू लागली असून, विस्कळीत, अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मागील ४० दिवसांमध्ये शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत एक हजार ९२ तक्रारी महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर आल्या आहेत. यामधील ५४३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, ५४९ तक्रारी प्रलंबित आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात २५ नाेव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अनियमित, अपुऱ्या आणि कमी दाबाने पाणी येत असल्याची नागरिकांची सातत्याने ओरड सुरू आहे. उन्हाळा सुरू हाेताच शहरातील कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी टॅंकरद्वारे तहान भागवावी लागत आहे. गृहनिर्माण साेसाट्यांना टॅंकरचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. शहराला सध्या पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८०, तर एमआयडीसीकडून २० असा ६२० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा केला जाताे. त्यानंतरही औद्याेगिकनगरीतील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. दुसरीकडे शहराची लाेकसंख्या झपाट्याने वाढत असून, चारही बाजूंना टाेलेजंग इमारती उभ्या हाेत आहेत. लाेकसंख्या वाढत असताना पाण्याची मागणीही सातत्याने वाढू लागली आहे. भामा आसखेड धरणातून शहराला १६७ एमएलडी पाणी राखीव आहे. हे पाणी आणण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.

महापालिकेच्या प्रत्येक जनसंवाद सभेत पाण्याच्या तक्रारी वाढत आहे. १ फेब्रुवारी ते १२ मार्च या ४० दिवसांच्या कालावधीमध्ये महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर अपुऱ्या व कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असल्याच्या एक हजार ९२ तक्रारी आल्या आहेत. ‘ड’ प्रभागातून सर्वाधिक २११, तर सर्वांत कमी ‘ह’ प्रभागातून ४५ तक्रारी आल्या आहेत.

पवना धरणात ५२ टक्के पाणीसाठा

पवना धरणातून दररोज पिण्यासाठी, सिंचनासाठी व औद्योगिक वापरासाठी पवना नदीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सद्य:स्थितीत पवना धरणामध्ये ५२.४६ टक्के (४.४६ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पवना उपसा जलसिंचन उपविभागाचे सहायक अभियंता सचिन गाडे यांनी केले आहे.

पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी गाडी, अंगण धुण्यासाठी वापरू नये. पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमाेद ओंभासे यांनी दिला आहे.