पिंपरी : ‘धरणातून पाणी मुबलक मिळत आहे. परंतु, महापालिकेला पाणी वितरणाचे नियोजन करता आले नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत आहे,’ असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. टँकरमाफियांना पोसण्यासाठी कृत्रिम पाणीटंचाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.
खासदार बारणे यांनी बुधवारी महापालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘थेरगाव, दापोडी, काळेवाडी, किवळे, वाल्हेकरवाडीसह शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठा विस्कळीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारी निकाली काढाव्यात. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा. उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू देऊ नका, नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे. रावेत बंधाऱ्यातील पाणी प्रदूषित झाले आहे. शिवणे बंधाऱ्यातून अशुद्ध पाणी उचलण्याबाबत चाचपणी करावी.’
‘मुळा नदीसुधार प्रकल्प राबविताना झाडे तोडू नयेत, आराखड्यात सुधारणा करून ८०० झाडे वाचविली आहेत. आणखी काही सुधारणा करून झाडे वाचविण्याचा प्रयत्न करावा. झाडांचे पुनर्रोपण करावे. थेरगाव पूल ते पिंपळे-सौदागर दरम्यान पवना नदीतील पात्रावर गवत उगवले आहे. गाळ साचला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. नदीपात्र स्वच्छ करावे.
शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांबरोबर एकत्र बैठक घ्यावी. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करावी. रस्त्यावर थांबणाऱ्या खासगी प्रवासी बसवर कारवाई करावी,’ अशा मागण्या त्यांनी केल्या.
पवना, इंद्रायणी नदीकाठच्या गावात ‘एसटीपी’ प्रकल्प शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली आहे. इंद्रायणी नदीकाठच्या ३८ आणि पवना नदीकाठच्या १८ गावांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले जाणार आहेत. इंद्रायणीकरिता ६७१ कोटी, तर पवनेसाठी २१८ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.