पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या जलकेंद्रातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. जलकेंद्रातील महावितरणाच्या जनित्रांमध्ये (ट्रान्सफाॅर्मर) सातत्याने बिघाड होत असून, कायमस्वरूपी ठोस उपाययोजना कराव्यात, या महापालिकेच्या पत्रव्यवहाराला महावितरणकडून केराची टोपली दाखविली जात आहे. त्यामुळे महावितरणपुढे महापालिका हतबल ठरल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून महापालिका प्रतिदिन पाणी घेते. हे पाणी सिंहगड रस्त्यावरील मुख्य जलकेंद्रात येते. त्यावर प्रक्रिया झाल्यानंतर पर्वती, खडकवासला, पद्मावती, वारजे, लष्कर, चतु:शृंगी, एसएनडीटी अशा प्रमुख जलकेंद्रांतून शहराच्या विविध भागाला पाणीपुरवठा केला जातो.

हेही वाचा >>>PCMC : कचरा वेचकांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य

गेल्या काही दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम विद्युत पुरवठ्यावरही होत आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी जलकेंद्रात महावितरणने जनित्र बसविली आहेत. त्यामध्ये सातत्याने बिघाड होत आहे. केबल तुटणे, जनित्रामध्ये बिघाड होणे, जलकेंद्राचा वीजपुरवठा सातत्याने काही काळ खंडित राहणे अशा कारणांमुळे पंपिंग स्टेशनचे काम बंद पडत आहे. त्यामुळे काही भागाला पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर नागरिकांच्या रोषालाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.जलकेंद्रातील बिघाडामुळे मंगळवारीही (२७ ऑगस्ट) दक्षिण भागाला नियमित वेळेत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. या भागात उशिरा पाणी आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. ऐन पावसाळ्यात आणि धरणे तुडुंब भरलेली असतानाही या प्रकाराला सामोरे जावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा >>>PCMC : महापालिकेची ‘ई-रुपी’ प्रणाली अपयशी; पाच हजार विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित

जलकेंद्रासाठी विद्युत पुरवठ्यापोटी महापालिका वर्षाला शंभर कोटींपेक्षा जास्त देयके महावितरणला नियमित देत आहे. या पार्श्वभूमीवर विस्कळीत पाणीपुरवठा टाळण्यासाठी जनित्राची देखभाल-दुरुस्ती करावी, तांत्रिक बिघाड होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे पत्र पाणीपुरवठा विभागाने महावितरणला दिल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, महावितरणकडून त्याला केराची टोपली दाखविली जात आहे. महावितरण दाद देत नसल्याने महापालिकाही हतबल झाली आहे.

मुख्य पर्वती जलकेंद्रात बिघाड झाल्यास मध्यवर्ती भागातील पेठा, सहकारनगर, बिबवेवाडी, पर्वती, तावरे काॅलनी, वाळकेश्वरनगर, गंगाधाम परिसर, कोंढवा, शिवाजीनगर, डेक्कन, कात्रज या भागाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो, तर लष्कर केंद्रातील बिघाडामुळे हडपसर, मुंढवा, खराडी, कोंढवा, वानवडी, पुणे रेल्वे स्थानक भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. एसएनडीटी आणि चतु:शृंगी जलकेंद्रातील बिघाडामुळे कोथरूड, कर्वेनगर, औंध, पाषाण भागाला फटका बसत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply disrupted in pune city due to interrupted power supply pune print news apk 13 amy