पुणेकरांसाठी पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यात आले असून पाणीकपात करण्याची गरज भासणार नसल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दिली.
महापालिकेतर्फे जॅकवेलवरून पुण्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प मुंढवा येथे सुरू करण्यात आला आहे. मात्र, या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली. जिल्हा न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर शेतकरी उच्च न्यायालयामध्ये गेले असून या प्रकल्पाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी सोडताना पुणेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात विचारले असता गिरीश बापट यांनी या प्रकरणी राज्य सरकार उच्च न्यायालयामध्ये पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले. शेतीला चौथ्या आवर्तनासाठी कॅनॉलमधून पाणी सोडण्यात येत आहे. धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. पुणेकरांसाठी पिण्याचे पाणी राखून ठेवण्यात आले आहे. जूनमध्ये पाऊस झाला तर पाण्याची कमतरता दूर होणार आहे. त्यामुळे सध्या तरी पाणीकपात करण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही गिरीश बापट यांनी सांगितले.

Story img Loader