पिंपरी : महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या वादात समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा १५ दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. जलप्रदूषण आणि पाणीपट्टीपोटी ८९ काेटी रुपयांची मागणी करून जलसंपदा विभागाने आंद्रा धरणातून साेडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात केली आहे. औद्याेगिक दराने जलसंपदा विभाग पाणीपट्टी मागत असल्याचा दावा महापालिकेचा आहे, तर वाणिज्य वापराप्रमाणेच पाणीपट्टीची आकारणी करण्यात आली असून, पाणीपट्टी भरल्यानंतर शंभर एमएलडी पाणी देण्याची भूमिका जलसंपदा विभागाने घेतली आहे. महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या वादात समाविष्ट भागातील नागरिकांना भर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला समाेरे जावे लागत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लाेकसंख्येचा विचार करून राज्य सरकारने भामा आसखेड धरणातील १६७, तर आंद्रा धरणातील शंभर असे २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शहरासाठी राखीव ठेवले. पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून मे २०२३ मध्ये ५० एमएलडी पाणी निघाेजे येथील बंधाऱ्यावरून घेण्यास सुरुवात केली हाेती. त्यामध्ये टप्प्याटप्याने शंभर एमएलडीपर्यंत वाढ झाली. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून पाणी वितरित केले जाते. त्यामुळे समाविष्ट गावांतील चिखली, माेशी, जाधववाडी, चऱ्हाेली, डुडूळगाव, दिघी, तळवडे या भागातील पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटला हाेता. मात्र, जलप्रदूषण, थकबाकी असे ८९ काेटी रुपये महापालिकेने द्यावेत, यासाठी जलसंपदा विभागाने आंद्रा धरणातून साेडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात केली आहे. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून निघाेजे बंधाऱ्यातून शंभर ऐवजी ४० ते ४५ एमएलडी पाणी महापालिकेला मिळत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

उन्हाचा चटका वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट झाली आहे. त्यामुळे चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा हाेणाऱ्या समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस पडत आहे.

नेमका वाद काय?

महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीत साेडणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिका जेवढे पाणी उचलते, तेवढे पाणी शुद्ध करत नसल्याचा जलसंपदा विभागाचा दावा आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या नियमानुसार दंड आकारला जाताे. दंडासह ८९ काेटी रुपये महापालिकेने द्यावेत, अशी भूमिका जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे. आंद्रा धरणातून महापालिकेला शंभरऐवजी ४० ते ४५ एमएलडी पाणी देण्यात येत आहे.

सध्या शहराला हाेणारा पाणीपुरवठा

पवना धरण – ५२० एमएलडी

आंद्रा धरण – ४० ते ४५ एमएलडी

एमआयडीसी – ३० एमएलडी

एकूण – ५९५ एमएलडी

आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट झाल्याने पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलसंपदा विभागाकडून औद्याेगिक दराने पाणीपट्टीची मागणी केली जात आहे. महापालिका औद्याेगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करत नाही. महापालिकेची पाणीपट्टी भरण्याची तयारी असून, जलसंपदा विभागाने पाणीपुरवठा सुरळीत करावा, असे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमाेद ओंभासे म्हणाले. तर, पाण्याचा दर, वाढीव दर, थकबाकी, जलप्रदूषण, दंड असे मिळून ८९ काेटी रुपये महापालिकेकडे थकीत आहेत. महापालिकेने थकबाकीसह पाणीपट्टी भरावी. त्यानंतर शंभर एमएलडी पाणी साेडण्यात येईल, अशी भूमिका जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी घेतली.