पिंपरी : महापालिकेच्या सेक्टर क्रमांक २३ निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्ती कामामुळे गुरुवार (१७ ऑक्टोबर) रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) रोजीचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सेक्टर क्रमांक २३ निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील टप्पा क्रमांक दोनचे फिल्टर हाऊसचे इनलेट गेट बदलण्यात येणार आहे. टप्पा क्रमांक एकचे सीएलएफ ड्रेनचा व्हॉल्व बदलणे, टप्पा क्रमांक दोनचा व्हॉल्व बसवणे आदी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा नियमित वेळेत होणार असून संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच पाणीपुरवठा आणि विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी सर्व यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असल्याने शुक्रवारी ऑक्टोबरचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार आहे. सर्व नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा – पुणे : दांडीयात तरुणावर कोयत्याने वार करणारे सराइत गजाआड

हेही वाचा – कचरा व्यवस्थापनाचा ‘कचरा’

पाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा

समन्यायी पाणीपुरवठ्याचे कारण देत शहराला पाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या शहराला पवना ५१०, आंद्रा धरणातून ८०, एमआयडीसीकडून २० असे ६१० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी पुरवठा केला जात आहे. यापैकी ४० टक्के वहनतूट, पाणीगळती व चोरी होत असल्याचे प्रशासन गेल्या पाच वर्षांपासून सांगत आहे. मात्र, त्यावर ठोस उपाय अद्याप सापडत नाही, अशी स्थिती आहे. मागील पाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तोही अनियमित, अपुरा व कमी दाबाने होतो.