पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत आहे. त्यामुळे शहरवासीयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पाणीपुरवठा विभागाचा नियोजनशून्य कारभार या परिस्थितीला जबाबदार असल्याची तक्रार नागरिक तसेच लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा- पुणे-नगर-औरंगाबाद द्रुतगती महामार्गाच्या कामाला वेग; भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती
पालिकेच्या क, इ आणि फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डुडूळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, पांजरपोळ, सेक्टर १२, इंद्रायणीनगर आदी भागांतील पाणीपुरवठा शुक्रवारी पूर्णपणे विस्कळीत झाला होता. मुख्य जलवाहिनीला उपवाहिन्या जोडणीचे काम सुरू केल्याचे कारण देण्यात आले होते. उशिरापर्यंत ते काम पूर्ण होऊ शकले नव्हते. दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी होईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. तिसऱ्या दिवशी फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत प्रभाग क्रमांक ११, १२, १३ येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. जलवाहिन्यांमध्ये अचानक गळती सुरू झाल्याचे कारण तेव्हा देण्यात आले. त्याचा परिणाम दोन दिवसांपासून या भागात पाण्यावाचून नागरिकांची गैरसोय झाली. काही दिवसांपासून शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत आहे.
हेही वाचा- पुणे-नाशिक रस्त्याची दुरुस्ती दहा दिवसांत न केल्यास… खासदार अमोल कोल्हे यांचा संबंधितांना इशारा
या संदर्भात पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्रीकांत सवणे म्हणाले, की शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर आणि भविष्यातील लोकसंख्या विचारात घेता नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन सवणे यांनी केले आहे.