गेल्या अडीच वर्षे राज्यात भाजपची सत्ता नव्हती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक विकासकामांना अडथळे येत होते, असा आरोप भाजपचे आमदार व पिंपरीचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी केला आहे. सुदैवाने आता राज्यात भाजपचे सरकार आले असून रखडलेली कामे आता मार्गी लागतील, अशी ग्वाही लांडगे यांनी दिली. पालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने महत्त्वपूर्ण पाणीपुरवठा प्रकल्प रखडल्याची टीकाही त्यांनी केली.
चिखली, मोशी, चऱ्होली, डुडूळगाव, जाधववाडी आदी समाविष्ट गावांतील सोसायटीधारकांच्या अडचणींसाठी आमदार लांडगे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते. रस्ते, पाणी आणि वीज संदर्भात सुमारे ७० जणांनी तक्रारी मांडल्या. माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, महावितरणचे अधिकारी उमेश कवडे, रमेश सूळ, महापालिकेचे रामनाथ टकले, दिनेश पाठक, अनिल ईदे, स्थापत्य विभागाचे अनिल शिंदे आदी उपस्थित होते. याव्यतिरिक्त लांडगे यांनी जिथे समस्या आहत, अशा ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेतल्या आणि रखडलेली कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
लांडगे म्हणाले, चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून नोव्हेंबर २०२२ मध्ये अपेक्षीत असलेले पाणी पालिकेत प्रशासक व राज्यात विरोधी पक्षाची सत्ता असल्याने मिळाले नाही. आता लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल.