पुणे : पुणे महसूल विभागातील केवळ पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांतच एप्रिलअखेरीस टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. उर्वरित सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत अद्याप टँकरची गरज भासलेली नाही. त्यामुळे यंदा पुणे विभागात पाण्याची स्थिती चांगली असल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर वर्षी फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्च महिन्यापासून पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली या तीन जिल्ह्यांमधील दुष्काळी गावांकडून टँकरची मागणी होत असते. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून खासगी आणि शासकीय टँकरने संबंधित गाव, वाडी, वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील बहुतांश सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली होती. तसेच यंदा अवकाळी पावसामुळे गेले काही दिवस ढगाळ वातावरण होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून सध्या केवळ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका, तर साताऱ्यातील वाई, पाटण आणि कराड तालुक्यांमध्ये टँकरची मागणी आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात २४ एप्रिलपासूनच टँकरची मागणी झालेली आहे, असेही विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> पिंपरी महापालिकेकडून मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी २७६ कोटी

दरम्यान, पुण्यातील आंबेगावात सध्या आठ टँकर सुरू असून, त्यात शासकीय दोन, तर सहा खासगी टँकरचा समावेश आहे. सात गावे आणि ३४ वाड्या बाधित असून, १२ हजार ४३५ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात वाई आणि पाटण तालुक्यात प्रत्येकी एक, तर कराडमध्ये दोन टँकर सुरू आहेत. या जिल्ह्यात चार गावे आणि एक वाडी बाधित असून, ३६३३ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच सहा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. एकूण पुणे विभागात पुणे आणि साताऱ्यात १६ हजार ६८ नागरिकांना एकूण १२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, असेही विभागीय आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा

भीमा खोऱ्यात २६ धरणे असून, टेमघर धरणवगळता इतर धरणांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. कृष्णा खोऱ्यात १३ धरणे आहेत. त्यांपैकी केवळ धोम बलकवडी आणि दूधगंगा या धरणांमध्ये २० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असून, उर्वरित धरणांत पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply started by tankers in pune satara districts pune print news psg 17 ysh
Show comments