लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ५ ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर २३ निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्ती, पाणी वितरण व्यवस्थेतील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

आणखी वाचा-वीस लाख रुपयांचे पाच कोटी करण्याचे आमिष… भोंदूसह साथीदारांविरुद्ध गुन्हा

गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केला जाईल. परंतु, त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply to pimpri chinchwad will be closed next thursday pune print news ggy 03 mrj