लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भामा आसखेड धरणाच्या जॅकवेलमधील केबल बुधवारी जळाल्याने वडगाव शेरी, धानोरी, विमाननगर, विश्रांतवाडी भागातील पाणीपुरवठा गुरुवारीदेखील विस्कळीत होता. दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी पूर्ण झाले असले, तरी पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही.

शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. विस्कळीत पाणीपुरवठ्याचा सुमारे तीन लाख रहिवाशांना फटका बसला आहे.

धानोरी, येरवडा, विश्रांतवाडी भागातील रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून अपुरे आणि कमी दाबाने पाणी येत असल्याने ते त्रस्त आहेत. या भागाला भामा आसखेड धरणातून पाणी दिले जाते. पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही यामध्ये सुधारणा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच बुधवारी दुपारी भामा आसखेड धरणाच्या जॅकवेलमधील केबल जळाली. त्यामुळे वडगाव शेरी, लोहगाव, येरवडा यासह ज्या भागांना भामा आसखेडमधून पाणीपुरवठा होतो अशा भागातील पुरवठा विस्कळीत झाला.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. बुधवारी दुपारनंतर बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद होता. दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून गुरुवारी (६ मार्च) दुपारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला होता. मात्र, हा दावा फोल ठरला. गुरुवारी देखील या भागातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले.

केबल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले, तरी जॅकवेल बंद राहिल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे गुरुवारीदेखील नगर रस्ता आणि अन्य भागात पाणी पुरवठा विस्कळीत होता. या भागातील पाणीपुरवठा आज शुक्रवारी (७ मार्च) सायंकाळपर्यंत सुरळीत होईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

लष्कर-बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे म्हणाले, भामा आसखेड जॅकवेलमधील केबल जळाल्याने वडगाव शेरी, येरवडा, धानोरी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, शुक्रवारी दिवसभरात हा पाणीपुरवठा सुरळीत होईल.

Story img Loader