पुणे : शहरातील पाणीचोरीला आळा घालण्यासाठी महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली असली, तरी या योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीतूनही पाणीचोरी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. समान पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्यांवर ७०० अनधिकृत नळजोड घेण्यात आले असून, जलवाहिनी टाकणाऱ्या कंपनीने त्याचा अहवाल महापालिकेच्या पाणीपुरठा विभागाला दिला आहे.
शहराला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. ही योजना साडेचार हजार कोटींची असून, एक हजार ६०० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकणे, जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्यांची दुरुस्ती, ८३ साठवणूक टाक्यांची उभारणी आणि निवासी तसेच व्यावसायिक मिळकतींना जलमापक बसविणे अशा टप्प्यात कामे सुरू करण्यात आली आहेत. योजनेसाठी शहराचे १४१ विभाग करण्यात आले असून, काही विभागांतील कामे पूर्ण झाली आहेत.
हेही वाचा – पीएमआरडीए – महापालिका आमनेसामने; ‘पुणेरी मेट्रो’च्या स्थानकांचा तिढा
जलवाहिनीची कामे पूर्ण झालेल्या विभागाचे लेखापरीक्षण करण्यात आले होते. जलकेंद्र किंवा साठवणूक टाक्यांतून जलवाहिनीत पाणी सोडल्यानंतर ते किती वेळात घरात पोहोचते, याची तपासणीही करण्यात आली होती. त्या वेळी ७०० ठिकाणच्या जलवाहिन्यांवर अनधिकृत नळजोड घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसा अहवाल योजनेचे काम करणाऱ्या कंपनीने महापालिकेला दिला आहे. जलपमाक असतानाही अनधिकृत नळजोड घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे योजनेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, समान पाणीपुरवठा योजनेचे काम पोलीस बंदोबस्तात करण्याची सूचना महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी केली आहे. तसेच योजनेतून पाणी चोरी करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
हेही वाचा – आजी-माजी राष्ट्रपतींची पुण्यात अनोखी भेट
समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू आहे. तपासणीवेळी काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहे. त्यावर कारवाई केली जाईल. – नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग