Rupali Thombre Patil: शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र आले पाहीजे, अशी चर्चा १२ डिसेंबर पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली. निमित्त होते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या भेटीगाठींचे. त्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी मूठ घट्ट असेल तर ताकद वाढते, असे सूचक विधान केले, त्यामुळे या चर्चेला आणखी हवा मिळाली. यानंतर दोन्ही गटाच्या वतीने प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या. मात्र अजित पवार यांच्या गटातील रुपाली ठोंबरे पाटील यांची एक प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत आहे. शरद पवारांबरोबर जायचे की नाही? याचा निर्णय स्वतः अजित पवार घेतील, हे सांगताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युती केली तरी आम्हाला ते मान्य असेल.

“सुनंदा पवार या कुटुंबाचा घटक आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्र येण्याची भावना बोलून दाखवली. पण आमच्यासाठी अजित पवार जो निर्णय घेतील, तो महत्त्वाचा असेल. जेव्हा फूट पडली, तेव्हा प्रत्येकालाच याबद्दल दुःख वाटले होते. वेगळे न होता आपली वज्रमूठ घट्ट राहिली पाहीजे, असे सर्वांनाच वाटते. लोकसभा आणि विधानसभेच्या निकालानंतरही अजित पवार यांनी समोरच्या लोकांवर टीका केली नाही. पण शरद पवार यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनीच अजित पवारांवर नको ती टीका केली”, असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

हे वाचा >> राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम आता प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीकडे, असा असणार पुतळा

दोन पवार एकत्र आले तर शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांची कुचंबणा होईल, असाही आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला. मुळात राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडण्यात अंकुश काकडे आणि त्यांच्यासारख्या इतर नेत्यांचाच जास्त सहभाग आहे. उद्या अजित पवारांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तरी तो आम्हाला मान्य असेल. तसेच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युती केली तरी तो निर्णय आम्हाला मान्यच असेल. उद्या जर दोन्ही गट एकत्र आले तर अजित पवारांवर बेछूट आरोप करणाऱ्या नेत्यांचीच अधिक कुचंबणा होईल, असेही रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

Story img Loader