पुणे प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे शिंदे फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ दोन दिवसापूर्वी घेतली. त्या घटनेनंतर अनेक राजकीय घडामोडी घडत असून शरद पवार की अजित पवार यांच्या सोबत जायचं अशा संभ्रम अवस्थेत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. त्याच दरम्यान उद्या शरद पवार आणि अजित पवार यांनी बैठकीच आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण आता नेमक कोणासोबत जायचं, त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात राष्ट्रवादी काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी धनकवडी येथील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्या बैठकीनंतर प्रदीप गारटकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता. आमच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी शरद पवार श्रीकृष्ण यांच्या रूपात आहेत आणि अजित दादा अर्जुनाच्या रूपात आहेत. तर आम्हा कार्यकर्त्यांचा अभिमन्यू झाला असून आम्ही शरद पवार यांचे की, अजित पवार यांचे या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण झाले आहे.” अशी भूमिका यावर त्यांनी मांडली.
आणखी वाचा-पुणे महापालिकेत एकहाती सत्तेचे भाजपचे स्वप्न धूसर
तसेच ते पुढे म्हणाले की, “राज्यात दोन दिवसापूर्वी घडलेल्या सत्ता नाटयामुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी १३ जिल्ह्यांपैकी पाच तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित राहू शकले नाही. त्यातील काहींच्या स्थानिक स्तरावर बैठका सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. पण आज झालेल्या बैठकीमध्ये शरद पवार की अजित पवार यांच्या सोबत जायचं याबाबत कोणत्याही प्रकाराचा निर्णय झाला नसून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “उद्या मुंबईत शरद पवार आणि अजित पवार यांनी बैठक आयोजित केली आहे. त्या दोन्ही पैकी कोणत्या बैठकीला जायचे असा प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर आहे. पण मी दोन्ही बैठकीला जाणार आहे” अशी भूमिका यावेळी मांडली.