‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी आम्ही दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच कार्यकर्ते आहोत. मात्र, याचा अर्थ संघ सरकार चालवते असा होत नाही,’’ असे उत्तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी विरोधकांच्या टीकेला दिले. पुण्यातील कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये झालेल्या समन्वय बैठकीवर विरोधी पक्षांनी टीका केली होती. सरकार संघाकडून चालवले जात आहे आणि गोपनीयतेच्या शपथेचा सरकारकडून भंग होत आहे, अशी टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. त्याबाबत सिंग यांना माध्यमांनी विचारले असता, या टीकेत काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘विरोधकांच्या टीकेत काहीही तथ्य नाही. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहोत. मात्र, त्यात कुणालाच काही अडचण असण्याचे कारण नाही. याचा अर्थ सरकार संघाकडून चालवले जाते असा होत नाही. आम्ही गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्याचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नाही.’’
उद्योग आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधताना सिंग म्हणाले, ‘जनतेने आम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. प्रत्येक गोष्टीचे परिणाम लगेच दिसत नाहीत. मात्र, अनेक गोष्टींबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांचे थोडय़ाच दिवसांत चांगले परिणाम दिसतील. देशातील महागाई आटोक्यात आहे. रिझव्र्ह बँकेने व्याजदर कमी केले आहेत, त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल. समाजातील आर्थिक असमतोल कमी करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी १८ कोटी कुटुंबांची बँकेत खाती उघडण्यात येत आहेत.’’
परदेशी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणार
‘‘पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान सायमंड या दक्षिण सुदान मधील विद्यार्थ्यांने परदेशी विद्यार्थ्यांचे प्रश्न राजनाथ सिंग यांच्यापुढे मांडले. परदेशी विद्यार्थ्यांच्या नोंदणीला उशीर होत असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे परदेशी विद्यार्थ्यांना काही वेळा चांगली वागणूक मिळत नाही. विशेषत: आफ्रिकेतून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा रंग, दिसणे अशा गोष्टींवरून शेरेबाजीला सामोरे जावे लागते, असे गाऱ्हाणे या विद्यार्थ्यांने मांडले. आम्ही सुरक्षित आहोत पण सन्मानाची वागणूक मिळावी आणि भारतीय विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी शासनानेही प्रयत्न करावेत, असे आवाहनही या विद्यार्थ्यांने केले. त्या पाश्र्वभूमीवर परदेशी विद्यार्थ्यांचे प्रश्न एका महिन्यात सोडवले जातील, असे आश्वासन सिंग यांनी दिले. ‘भारतीय विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यार्थ्यांना सन्मानाने वागवावे. भारताची प्रतिमा चांगली राहील याची काळजी घ्यावी,’ असे आवाहनही सिंग यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा