मतदारांमधील उत्साह पाहता महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझा विजय होईल, असा विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला आहे. पार्थ पवार यांचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला. याबद्दल अद्यापही मनात दुःख आहे. तेव्हा मी राष्ट्रवादी पक्षाचा शहराध्यक्ष होतो. अशी आठवण करून देत या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज असल्याचं अप्रत्यक्षपणे वाघेरे म्हणाले आहेत. ते पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चुरशीची लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत प्रचार केलेला आहे. आज त्यांचं नशीब ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दरम्यान, गेल्या दहा वर्षांत बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात म्हणावा तसा विकास केला नाही. या कारणाने मतदार नाराज आहेत. यामुळेच माझ्या विजयाचा विश्वास अधिक वाढल्याचं संजोग वाघेरेंनी म्हटले आहे. ही निवडणूक मतदारांनी हातात घेतलेली आहे असंही त्यांनी अधोरेखित केलं.
पार्थ पवार यांच्या पराभवावर प्रश्न विचारल्यानंतर वाघेरे म्हणाले, त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष होतो. पार्थ पवार यांचा विजय व्हावा यासाठी आम्ही कामही केलं. मात्र, त्यांचा श्रीरंग बारणे यांनी पराभव केला. त्याचे आजही मनात दुःख निश्चितच आहे.