परदेशी विद्यार्थी चित्रपट रसग्रहणासाठी पुण्यात
‘भारतीय चित्रपटांच्या कथा इथल्या मातीशी जोडलेल्या आहेत..या चित्रपटांमध्ये खूप वैविध्य आहे..हिंदी गाणी आम्हाला जवळची वाटतात..,’ हे सांगताहेत भारतीय चित्रपटांचा अभ्यास करणारे परदेशी विद्यार्थी!
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) या संस्थांतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या चित्रपट रसग्रहणाच्या महिनाभराच्या अभ्यासक्रमात यंदा अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि श्रीलंका असे विविध देशांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. शनिवारी या अभ्यासक्रमाच्या समारोपाच्या वेळी ‘लोकसत्ता’ने या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
अमेरिकेच्या अ‍ॅलेक्स सुबर या विद्यार्थ्यांला भारतीय चित्रपटांमधील वैविध्य भावले. तो म्हणाला, ‘‘जगात इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात अधिक चित्रपट बनतात. त्या दृष्टीने भारतीय चित्रपट हे जागतिक चित्रपटसृष्टीचे नेतृत्व करतात असेही म्हणता येईल. या चित्रपटसृष्टीत सांस्कृतिक विविधता आहे. ते त्यांच्या मातीतल्या गोष्टी पडद्यावर आणतात. इथे येण्यापूर्वी मला प्रामुख्याने ‘बॉलिवूड’चा परिचय होता. शाहरूख खान आणि आमीर खान माहिती होते. सत्यजित रे यांचे काही चित्रपट आणि आताचे ‘पीके’ आणि ‘थ्री इडियट्स’ मी पाहिले होते.
पण इतर भारतीय भाषांमधील चित्रपट मला नवीन होते. ‘तनीर तनीर’सारख्या चित्रपटातून मला तमिळनाडूतील चित्रपट आणि राजकारणाच्या संबंधाची ओळख झाली.’’
भारतीय वंशाच्या कॅनडात राहणाऱ्या सुनेरा थोबानी यांना चित्रभाषेचा राजकारणावर होणारा परिणाम समजून घेणे महत्त्वाचे वाटते. त्या म्हणाल्या, ‘‘भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपटांइतके विकसित झाले आहेत. तांत्रिकदृष्टय़ा भारतीय चित्रपट प्रगत आहेतच, पण त्यातील वैविध्यही मोठे आहे. बाहेरील देशांत आम्हाला या विविधतेतील केवळ काहीच चित्रपट बघायला मिळतात. त्याचे इतर पैलू जाणून घेणे महत्त्वाचे वाटते. आता भारतीय चित्रपटसृष्टीचे जागतिकीकरण होते आहे. चित्रपट राजकारणावरही परिणाम करतात. त्यामुळे ही चित्रभाषा समजून घेण्यात मला रस आहे.’’ फ्रान्सची सोहाया ही पीएच.डी.ची विद्यार्थिनीही भारतीय चित्रपटांच्या इतिहासाचा अभ्यास करते आहे. जागतिक चित्रपटांबद्दलचे काही अभ्यासक्रम तिने केले होते. पण भारतीय चित्रपटांबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी रसग्रहणाचा फायदा झाला, असे ती म्हणते.
रोशन प्रियंकारा हा श्रीलंकेचा विद्यार्थी व्यावसायिक मॉडेल आणि अभिनेता आहे. हिंदी गाणी आणि त्यावरील नाच यामुळे त्याला भारतीय चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. तो म्हणाला, ‘‘मी सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील हिंदी गाणी ऐकतच मोठा झालोय. शाहरूख खान मला आवडतो. अभिनेत्यांची जीवनचरित्रे वाचायलाही आवडते. पुढे ‘एफटीआयआय’मध्ये येऊन अभिनय शिकण्याचे माझे स्वप्न आहे.’’ गयान मधुशंकर हाही श्रीलंकेचा विद्यार्थी आहे. तो पत्रकारितेसह जाहिरातींसाठी ‘क्रिएटिव्ह डिरेक्टर’ म्हणून काम करतो. तो म्हणाला, ‘‘मला भारतीय आणि श्रीलंकन चित्रपट जवळचे वाटतात. श्रीलंकेतील बहुतेक लोकांना हिंदी चित्रपटांमुळे हिंदी भाषा कळते आणि हे चित्रपट, त्यातील अभिनेते तिथे लोकप्रियही आहेत. श्रीलंकेत रविवारी संध्याकाळी दूरचित्रवाणीवर ‘भारत गीत’ नावाचा कार्यक्रम लागतो. लोकांना जुनी हिंदी गाणी अजूनही आवडतात.’’