‘‘राजकीय पातळीवर चीनबाबतच्या धोरणाविषयी राजकीय पातळीवर अधिक पारदर्शकता आवश्यक आहे. त्याचबरोबर चीनशी वाटाघाटी करताना ६२ सालच्या युद्धानंतर तयार झालेली पराभूत मनोवृत्ती सोडून देणे गरजेचे आहे,’’ असे मत एनडी टीव्हीचे संरक्षण संपादक नितीन गोखले यांनी मंगळवारी व्यक्त केले.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ‘चीनची भारतातील घुसखोरी आणि माध्यमे’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात गोखले बोलत होते. या वेळी गोखले म्हणाले, ‘‘भारताच्या कचखाऊ धोरणामुळे सीमाप्रश्न गेली अनेक वर्षे भिजत पडला आहे. भारताचे मध्य आशियातील प्राबल्य रोखण्यासाठी दोनतीन वर्षांनी कुरापती काढून चीन वाद निर्माण करत असतो. चीनने इतर देशांशी असलेला सीमावद संपुष्टात आणला आहे. एखाद्या देशाची आर्थिक किंवा राजकीय स्थिती कमकुवत झाल्यानंतर चीनने त्या देशाबरोबरील सीमाप्रश्न निकालात काढला आहे. यापूर्वी फक्त व्यापाराच्या दृष्टीने भारताबरोबर चर्चा करणारा चीन आता सीमा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पुढाकार घेत आहे. पश्चिमेकडे विस्तार करण्याची चीनची महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन भारताने धोरणे आखणे आवश्यक आहे.
चीनबरोबर वाटाघाटी करतानाच चीनच्या शेजारील राष्ट्रांशी भारताने उत्तम संबंध राखणे आवश्यक आहे. चीनशी १४ देशांच्या सीमा जोडलेल्या आहेत. त्या सर्व देशांशी भारताने मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला हवेत. त्याचबरोबर ६२ च्या युद्धानंतर आलेली पराभूत मानसिकता सोडून द्यायला हवी आणि नौदल अधिक सुसज्ज करायला हवे. सीमेवर तैनात असणाऱ्या सैन्याला वेळेवर आणि चांगल्या सुविधा देणेही आवश्यक आहे. त्याचबरोबर सीमावर्ती भागातील विकासाकडे भारताने लक्ष देण्याची गरज आहे. चीन सीमावर्ती भागामध्ये विकास करत आहे. भारतानेही या भागात पायाभूत सुविधा निर्माण करायला हव्यात.’’
माध्यमांबाबत बोलताना गोखले म्हणाले, ‘‘माध्यमांकडूनही अनेक वेळी चुकीचे वार्ताकन केले जाते. मात्र, सरकारी पातळीवर योग्य आणि पुरेशी माहिती न मिळाल्यामुळे अनेकदा वार्ताकनामध्ये चुका होतात. चीनबाबतच्या धोरणात सरकारने अधिक पारदर्शक असणे गरजेचे आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा