अर्थमंत्री जेटली; पवारांच्या सूचना विचारात घेण्याचेही सूतोवाच
गेल्या चाळीस वर्षांमध्ये शरद पवार यांनी बारामतीचा खूपच चांगला विकास केला आहे. जेव्हा देशात बारामतीसारखी शंभर शहरे उभी राहतील तेव्हा भारत खरा विकसित होईल अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पवारांवर स्तुतिसुमने उधळली.
बारामतीचा दौरा हा आपल्यासाठी विकासाचा वेगळा अनुभव देणारा आहे, असे मत अरुण जेटली यांनी बारामती येथील नूतन कृषी महाविद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात व्यक्त केले.
जेटली यांनी सांगितले, की शेती, पीकप्रक्रिया, दूध उत्पादन, विक्री, मुला-मुलींचे शिक्षण या क्षेत्रांमधून विकासाला चांगली गती मिळाली आहे, तसेच अनेक कठीण आव्हाने स्वीकारून त्यांनी विकासाचा मार्ग साधला आहे. त्यांनी इंडोनेशिया, नेदरलँड, थायलंड या देशांची मदत घेऊन कृषी क्षेत्रात नवनवीन कृषी तंत्रज्ञानाच्या सहकार्याने बारामतीमध्ये चांगली प्रगती केली आहे.
शारदानगर येथील डॉ. अप्पासाहेब पवार सभागृहात शनिवारी आयोजित कार्यक्रमात जेटली बोलत होते. आपल्या भाषणात शरद पवार यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची मनापासून प्रशंसा करून त्यांनी बारामतीची चांगली प्रगती केल्याचे नमूद केले. शरद पवार यांनी केलेल्या सूचनांचाही अवश्य विचार केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार म्हणाले, की अरुण जेटलींना बारामतीला बोलावण्यामागे आमचा स्वार्थ होता. ऊसउत्पादन व शेतीसाठी पाणी मोठय़ा प्रमाणावर लागते. इंडोनेशियामध्ये उसाच्या पिकाला वर्षांतून फक्त आठच महिने पाणी द्यावे लागते आणि चार महिने पाणी न देता उसाचे पीक टिकू शकते, अशा नवीन प्रजातीच्या ऊसपिकांचे ऊत्पादन आपल्या भारतासाठी अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. कृषी विज्ञान केंद्र तसेच वसंतदादा इन्स्टिटय़ूटच्या वतीने अशा उसाच्या नवीन प्रजातींचा विकास करून उसाचे पीक घेण्याची आज खरी गरज आहे.
प्रास्ताविक राजेंद्र पवार यांनी केले. विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाचा नामकरण सोहळा विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात झाला. राहुल बजाज म्हणाले, की पवार हे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा