पुणे : ‘देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे. विरोध करणारे आवाज दाबले जातात. मतपेटीतून विरोध व्यक्त करण्यासाठीही विश्वास राहिलेला नाही. सामान्य माणसाला खिरापती वाटून, प्रलोभने दाखवून वेळप्रसंगी दडपशाही करून गंडवले जाते. विशिष्ट विचारसरणीचे लोक सत्तेत बसून हुकुमशाही पद्धतीने राज्यकारभार करत आहेत. गांधींच्या विचारांना न मानणारे लोक, त्यांच्याच पुतळ्याला नमस्कार करून राज्यकारभार चालवत आहेत. आजचे राजकारणी हुकूमशहा बनले आहेत. संवेदनशील झाले आहेत. अशा वेळी सत्याग्रहाला, गांधींना मानणारे साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते असो की, सर्वसामान्य माणूस असो, ज्यांच्या मनात विद्रोहाची वात तेवते आहे आहे, त्या सर्वांनीच अंतःकरणातला झरा मोकळा करायला हवा, आता सत्याग्रह करायला हवा. नाहीतर इतिहास माफ करणार नाही,’ अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी रविवारी व्यक्त केली.
गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित कार्यक्रमात सत्याग्रही विचारधारा मासिकाच्या ‘गांधी विचार साहित्य संमेलन २०२५’ विशेषांकाचे प्रकाशन आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाला राष्ट्र सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष राजा कांदळकर, गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, विश्वस्त डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन, संमेलनाचे समन्वयक राजेश कोंडे आदी उपस्थित होते.
आढाव म्हणाले,‘ उघड उघड लोकशाहीची विटंबना केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री दोन पक्ष फोडून आलो, असे सांगतात. ही परिस्थिती बघवत नाही. जाणकार नागरिक म्हणून हृदयातल्या वेदनात कशा मांडाव्यात, हा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांचे, कामगारांचे विद्यार्थ्यांचेही प्रश्न आहेत. मात्र, भारतीय मन मेलेले नाही. लोक हुकूमशाही सहन करणारे नाहीत.’ ‘इथे जगलेल्या, जगणाऱ्या प्रत्येकाचा विचार सहजीवनाचा आहे आणि गांधी हे त्या विचारांचाच अर्क आहे. गांधीजींचे विचार जिवंत राहावेत म्हणून या संमेलनाचे आयोजन केले आहे. गांधी विचार समजून घेण्यासाठी या तीन दिवसीय संमेलनाला उपस्थित रहावे,’ असे आवाहन डॉ. कुमार सप्तर्षी यांनी या वेळी केले.