करोना विषाणूचा पहिला रुग्ण आपल्याच शहरात आढळल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर, आम्ही घाबरून गेलो होतो. आपल्याकडे येणारा ग्राहक कोणत्याही भागातील असतो. या आजाराची लक्षणं साधारणपणे आठवड्याभरानंतर दिसून येतात. यामुळे आमच्या मनात भीती निर्माण झाली होती. एवढच नाहीतर आम्ही ग्राहक नाकारण्यासही सुरुवात केली. यानंतर आम्ही या संकटातून वाचतो की मरतो, असे देखील सतत मनात विचार येत होते. मात्र आम्ही सर्व नियमांचे पालन केल्याने, आमच्या भागात करोना विषाणूला शिरकाव करता आला नसल्याचे पुण्यातील बुधवार पेठेतील सेक्स वर्कर्स महिलांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले.
शहरातील बुधवार पेठमधील काही भाग रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. या भागात आजवर नेहमीच वर्दळ पाहिली. मात्र, करोना लॉकडाउन सुरू झाल्यानंतर मागील चार महिन्यांपासून या भागात शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. या परिसरातील एका-एका फ्लॅटमध्ये किमान दहा महिला राहत असून, येथे जवळपास तीन हजारांच्या आसपास महिलांची संख्या आहे. त्यामुळे सोशल डिस्टंन्स, मास्क,सॅनिटायझरचा वापर कसा केला जाईल,असा प्रशासनास प्रश्न पडला होता. मात्र तेथील महिलांनी सर्व नियमाचे पालन करून, करोना विषाणूचा आपल्या भागात शिरकाव होऊ दिला नाही.
या पार्श्वभूमीवर तेथील एका महिलेशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, मी मागील दहा वर्षांपासून बुधवार पेठेतील या रेड लाइट एरियात राहते. आजवर या भागातील अनेक घटना डोळ्यसमोर पाहिल्या पण, कधीही बुधवार पेठ बंद झालेली पाहिली नाही. मात्र मागील चार महिन्यांपासून करोनामुळे बुधवार पेठ बंद आहे. यामुळे आमचं जगणं कठीण झालं. ही बाब लक्षात घेता, या परिसरातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व सामाजिक संघटनांनी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळी आमच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यामुळे आमचं जगणं शक्य झालं. पण या संस्थेच्या देखील काही मर्यादा आहेत. त्यामुळे आता आमची पुढील जबाबदारी सरकारने घेऊन, आपण जोवर करोनामधून बाहेर पडत नाही. तो पर्यंत आमच्यासारख्या महिलांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, आमची मुले गावी राहतात, त्यांच्या शिक्षणासाठी पैसे आजवर पाठविले आहेत. आता सर्वच बंद झाल्याने त्यांच्या शिक्षणाचं पुढे कसं होणार? हा प्रश्न देखील आमच्या समोर निर्माण झाला आहे.
फ्लॅटचे भाडे कसे देणार?
आमच्या एका फ्लॅटमध्ये साधारण दहा महिला राहतात. त्याचे भाडे साधारण 30 हजार आणि लाईट बील स्वतंत्र आहे. तसेच ,आमच्या घरात कधीतरी जेवण तयार केले जायचं, अन्यथा हॉटेलमधून जेवण मागविणे. असं नेहमी करोनापूर्वी महिन्याला सर्वांचा खर्च मिळून लाखाच्या घरात जात होता. आता ग्राहक बंद झाले, जवळ असलेले पैसे संपत आले आहे. त्यामुळे आमच्या फ्लॅटचे भाडे कसे देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.