बनावट मतपत्रिकांच्या आधारे नाटय़ परिषदेची निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याचा डाव असून त्याविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. बनावट मतपत्रिका बाजूला केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आता उर्वरित मतपत्रिकांची मतमोजणी करावीच लागेल, असेही ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या नाटय़ परिषदेच्या निवडणुका हा नाटय़ परिषदेच्या इतिहासामध्ये लागलेला काळा डाग असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून मोहन जोशी म्हणाले,‘‘बनावट मतपत्रिका छापायच्या आणि खऱ्या मतपत्रिका फाडून टाकायच्या हे डोके एखाद्या महारथीचेच असले पाहिजे. मतपत्रिका छापण्यापासूनचे हे नियोजन आहे. नाशिकमधील ज्या प्रेसमध्ये मतपत्रिका छापल्या गेल्या तेथेच बनावट मतपत्रिकादेखील छापल्या गेल्या आहेत. या दोन्ही मतपत्रिकांच्या रंगामध्ये आणि त्यावर छापण्यात आलेल्या क्रमांकावरून हे सिद्ध होते. पहिल्या पाच दिवसांत १२५० मतपत्रिका पेटीमध्ये टाकल्या गेल्या. नंतर खऱ्या मतपत्रिका गोळा करण्यात आल्या. बऱ्याचशा मतपत्रिका हाती आल्या नाहीत तेव्हा गडबड झाल्याची ओरड ज्यांनी हा खेळ केला त्यांनीच केली. यामध्ये मी कोणाचेही नाव घेणार नाही. पण, ज्यांनी हा डाव केला तो आता त्यांच्यावरच उलटला आहे. प्रदीप कबरे यांनी ९ फेब्रुवारीला पहिली पेटी बाजूला करूनच उर्वरित मते एकत्र करण्यासाठीचा अर्ज दिला होता. मात्र, या मागणीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणताच निर्णय घेतला नाही.’’
बनावट मतपत्रिका बाजूला केल्यानंतर आता उर्वरित मतमोजणी घ्यावीच लागेल. बाकी सर्व ठिकाणी प्रतिस्पर्धी पॅनेलचा पराभव झाला असून डाव त्यांच्यावरच उलटला असल्यामुळे संपूर्ण निवडणूक नव्याने घेण्याची मागणी केली जात आहे. मात्र,  कायद्यानुसार निवडणूक रद्द करण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नाही. हा अधिकार धर्मादाय आयुक्तांचा आहे. त्यामुळे उर्वरित मतमोजणी घेतली जावी, या मागणीसाठी मी बुधवारी (२० फेब्रुवारी) धर्मादाय आयुक्तांची भेट घेणार आहे. त्यानंतरही निवडणूक रद्द केली गेली तर उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले. प्रसंगी नाटय़ परिषदेवर प्रशासक आला तरी हरकत नाही, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक रद्द होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
पराभूत उमेदवारांची फेरनिवडणुकीची मागणी
नाटय़ परिषदेच्या पुणे विभागातील पराभूत उमेदवारांनी सहा जागांसाठी फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी विभागीय निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष जानोरकर यांच्याकडे केली आहे. कित्येक उमेदवारांना मतपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पुणे विभागातील निवडणुकीमध्येही बनावट मतपत्रिका असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे या सर्व उमेदवारांनी आपल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे. दरम्यान, मतमोजणी झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत १७ मतपत्रिका पोहोचल्या असल्याची माहिती शिरीष जानोरकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा