मागील काही दिवसांपासून राज्यामधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा यासारख्या मुद्द्यांवरुन राज्यात भाजपा आणि मनसे एका बाजूने तर सत्ताधारी एका बाजूने असे गट पलड्याचं चित्र दिसत आहे. असं असतानाच आता भाजपा आणि मनसेची युती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार का वगैरेसंदर्भात दबक्या आवाजामध्ये राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु झालीय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला अद्याप अवकाश असला तरी आताच शहरांच्या तसेच राज्याच्या राजकारणात घडत असणारा घडामोडींमुळे आतापासूनच या निवडणुकीची चर्चा आहेत. अशातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.
नक्की वाचा >> “…तर राज ठाकरेंनी शिवसेना सोडायला नको होती”; रामदास आठवले स्पष्टच बोलले
काही जागी युती तर काही ठिकाणी स्वबळावर…
पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना आठवलेंनी राज्यामध्ये काही ठिकाणी त्यांचा पक्ष युतीमध्ये तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलंय. “महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका भाजपासोबत लढणार आहोत. तर जिकडे युती होणार नाही तिकडे स्वबळावर लढणार आहे,” असं आठवले म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना त्यांनी मुंबई आणि पुण्यासारख्या दोन महत्वाच्या शहरांमध्ये आरपीआय भाजपासोबत युती करणार असल्याचं स्पष्ट केलंय.
मुंबईत भाजपाचा महापौर झाला तर…
“मुंबई, पुण्यात युती होणार आहे. मुंबईमधील सत्ता उलथवून टाकण्याच प्लॅनिंग आमचं आहे. यावेळी जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न असणार आहे,” असं आठवलेंनी स्पष्ट केलंय. इतकच नाही तर, “मुंबईत भाजपाचा महापौर झाला तर आम्हाला उपमहापौर मिळावे यासाठी प्रयत्न केला जाणार आहे,” असंही आठवले म्हणालेत.
नक्की वाचा >> “…म्हणून राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये”; ठाकरे सरकारने लक्ष घालावं म्हणत आठवलेंची मागणी
…म्हणून भाजपाने राज ठाकरेंना सोबत घेऊ नये
“भोंग्यांबाबत भाजपाने काय भूमिका घेतली माहिती नाही. पण माझी अन् माझ्या पक्षाची भूमिका मी मांडली आहे. समाजात शांतता राखवी हा आमचा प्रयत्न आहे,” असं आठवलेंनी स्पष्ट केलंय. तसेच पुढे बोलताना, “मनसे आरपीआयची जागा भाजपामध्ये घेणार नाही. राज ठाकरेंना सोबत घेतलं तर मतदार नाराज होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांना भाजपाने सोबत घेऊ नये, असं माझं मत आहे. आमचं अस्तित्व संपणार नाही,” असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.