एमआयडीसीमधील कंपन्यांची कंत्राटे मिळविण्यावरून झालेल्या वादातून तळेगाव दाभाडे येथील भाजपचे शहराध्यक्ष सचिन शेळके यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. त्यात शेळके यांच्यासह त्यांचे वडील व दोन भाऊ जखमी झाले. हल्ल्याच्या निषेधार्थ शेळके यांच्या समर्थकांनी तळेगाव स्टेशन चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या घटनेनंतर तळेगाव स्टेशन भागामध्ये बंद पाळण्यात आला असून, या भागात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी संध्याकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली नव्हती.
एमआयडीसीतील कंपन्यांमधील कंत्राट मिळविण्यावरून प्रतिस्पर्धी गटाशी शेळके यांचे वाद सुरू होते. या वादाबाबत चर्चेने तोडगा काढू, असा दूरध्वनी शेळके यांना आला. त्यानंतर तळेगाव वराळे रस्त्यावरील कार्यालयात सचिन शेळके, त्यांचे वडील बाळासाहेब शेळके व भाऊ संदीप आणि संजय शेळके थांबले होते. त्या वेळी ५० जणांचा जमाव त्या ठिकाणी आला व त्यांनी थेट हल्ला चढवला. कार्यालयातील चौघांवर तीक्ष्ण हत्यारांनी वार करण्यात आले तसेच कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली.
सचिन शेळके यांचा गुरुवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या तयारीत सर्व कार्यकर्ते होते. शेळके यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या कार्यालयाजवळ मोठा जमाव जमला. शेळके यांनी उपचारासाठी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. संतप्त जमावासह ते तळेगाव स्टेशन चौकात आले आणि त्यांनी चौकात ठिय्या दिला. आपला पोलिसांवर विश्वास नाही. दोन पोलिसांसमक्ष आपल्यावर हल्ला झाला, असा आरोप शेळके यांनी केला. स्वत: गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडून आश्वासन मिळेपर्यंत आपण रुग्णालयात जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे तळेगाव स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. माजी आमदार दिगंबर भेगडे, नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते गणेश भेगडे, नगरसेवक सुनील शेळके यांनी त्यांना विनंती केली. त्यानंतर सचिन शेळके यांनी आंदोलन स्थगित केले. त्यानंतर त्यांना सेवाधाम रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

 

 

 
 

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weapon attack on talegaon bjp leader sachin shelke
Show comments