पुणे : राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे बुधवारपासून (९ ऑक्टोबर) ते शनिवारपर्यंत (१२ ऑक्टोबर) राज्यभरात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरून काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे हवेच्या वरच्या स्थरात कोरड्या उष्ण वाऱ्याची आणि बाष्पयुक्त वाऱ्याची घुसळण होऊन विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हा पाऊस शक्यतो सायंकाळी पडण्याचा अंदाज आहे. स्थानिक पातळीवर दुपारपर्यंत तापमान वाढून सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली केली आहे.

हेही वाचा >>>शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सहा कोटींची फसवणूक; फसवणूक करणारा गजाआड

भारतीय हवामान विभागाने ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केली आहे.

उत्तरे जास्त पाऊस होत असल्याचा परिणाम

साधारणपणे जेव्हा आसामकडील म्हणजे पूर्वोत्तर सात  राज्यांत व हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजे सिक्कीम हिमालयीन पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशाचा हिमालयीन भाग येथे अति जोरदार पाऊस होतो. तेव्हा महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारतात म्हणजे मध्य प्रदेश, छसत्तीगड या भागांत पावसाचे प्रमाण कमी होते. म्हणजेच कमी दाब क्षेत्रामुळे पडणारा पाऊस पूर्वेकडील सात राज्यांत व हिमालयाच्या पायथ्याशी पडतो. यंदा अशीच स्थिती निर्माण झाल्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे पावसाची शक्यता मावळली आहे. पण, ९ ते १३ ऑक्टोबर या काळात पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.