शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेची सर्वंकष माहिती एकाच छत्राखाली उपलब्ध करून देण्यासाठी संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. मार्गिकेची मूलभूत माहिती, कम्युनिटी कनेक्ट आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी होत असलेले प्रयत्न आणि नियोजन या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविले जाणार आहे.
हेही वाचा- मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना पुणे पोलिसांकडून बँडद्वारे मानवंदना
पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयसीटीएमआरएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. ‘पीआयटीसीएमआरएल’च्या बिझनेस हेड व संचालिका नेहा पंडित, ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता विवेक खरवडकर, अधीक्षक अभियंता रिनाज पठाण, भारतकुमार बाविस्कर आणि अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्यावतीने हिंजवडी ते शिवाजीनगर या तेवीस किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो मार्गिकेची कामे सुरू आहेत. मेट्रो मार्गिकेच्या कामांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. वापरण्यास सुलभ, आवश्यक सर्व माहिती एकत्रित स्वरूपात या संकेतस्थळावर मिळणार आहे, अशी माहिती संचालिका नेहा पंडित यांनी दिली.
हेही वाचा- नवले पूलावरील अपघात ब्रेक निकामी झाल्यामुळे नाही; ‘आरटीओ’चा अहवाल पोलिसांना सादर
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिका ‘पिंक लाइन’ म्हणून ओळखली जाणार आहे. त्यामुळे संकेतस्थळाच्या रंगसंगतीमध्येही त्याचा खास विचार करण्यात आला आहे. तूर्तास मार्गिकेची मूलभूत माहिती देणे, कम्युनिटी कनेक्ट आणि ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी होत असलेले प्रयत्न आणि नियोजन नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. जसजसे प्रकल्पाचे काम पुढे सरकेल, त्यानुसार संकेतस्थळाचे आरेखन आणि मजकूर अद्ययावत केला जाणार आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर पुढील महिनाभरात संकेतस्थळ सर्व नागरिकांसाठी खुले होईल.