नेहमीची ठराविक पध्दतीची लग्नपत्रिका टाळून तब्बल ३४ पानांची लग्नपुस्तिका तयार करण्याचा वेगळा प्रयोग निगडीत होणाऱ्या एका विवाहसोहळ्यात करण्यात आला आहे. दोन्ही परिवाराची आठ पिढय़ांची वंशावळ, मागील पिढय़ांमधील कर्तृत्ववान व्यक्तींची माहिती, विविध मार्गदर्शक लेख, शासकीय योजनांची माहिती आणि पानोपानी जाणवणारे छत्रपती शिवरायांवरील प्रेम हे लग्नपुस्तिकेचे वैशिष्टय़ आहे.
मूळचे उस्मानाबादच्या हराळी येथील सूर्यवंशी आणि लातूरच्या मोगरगा येथील जाधव परिवारात येत्या नऊ मे ला निगडीतील श्रीकृष्ण मंदिरात हा विवाहसोहळा संपन्न होत आहे. त्यासाठी काढण्यात आलेली पत्रिका ३४ पानांची आहे. त्यात सूर्यवंशी आणि जाधव परिवाराची वंशावळ मांडण्यात आली आहे. वधूवरांसह त्यांच्या आई-वडिलांची छायाचित्रेही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व आई तुळजा भवानीचे चित्र आहे. विवाहविधीची संपूर्ण माहिती आहे. मराठा बहुजनांची कुळे व उपनावे शब्दांच्या अर्थासह छापण्यात आली आहेत. पर्यावरण, हागणदारी मुक्त गाव, मुलगी वाचवा यासारख्या सामाजिक प्रश्नांची मांडणी करण्यात आली आहे. याखेरीज, पीएमपी बससेवेची मागणी, पत्रिका जुळण्यापेक्षा एड्स चाचणीच्या आवश्यकतेवर भर, घरातूनच ‘लेक वाचवा’ मोहिमेला सुरुवात करण्याचे आवाहन, पाण्याच्या नियोजनाचे महत्त्व, शिवजन्मोत्सव असे विषयही लग्नपुस्तिकेत हाताळण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wedding card shivaji awakening