मकर संक्रांतीच्या सणाबरोबरच माय मराठी भाषेतील साहित्य गोडीची अनुभूती देणाऱ्या सारस्वतांच्या स्वागतासाठी उद्योगनगरी उत्सुक झाली आहे. पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या ४० एकर मैदानावर साहित्य संमेलनाचा भव्य मंडप आणि ग्रंथनगरी साकारली असून आता संयोजकांसह साहित्यप्रेमी नागरिकांना शुक्रवारपासून (१५ जानेवारी) सुरू होत असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उत्कंठा लागली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य कमानी आणि भव्य फलकांच्या माध्यमातून साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
संमेलननगरीमध्ये मुख्य प्रवेशव्दारातून प्रवेश केल्यानंतर ८० फूट लांबीच्या आणि पाच फूट जाडीच्या थर्माकोलमध्ये साकारलेल्या निळ्या रंगाच्या फाउंटन पेनाच्या प्रतिकृतीने स्वागत केले जाणार आहे. हेच संमेलनाचे बोधचिन्ह आहे. शेतकरी, पुरोहित, पत्रकार, औद्योगिक कामगार, महिला आणि देशाचे रक्षण करणारा सैनिक अशा समाजाच्या वेगवेगळ्या घटकांनी हे भव्य पेन उंचावून धरले आहे. वरून थर्माकोल आणि आतून लोखंड असलेल्या संमेलनाच्या बोधचिन्हाचे वजनच एक टन आहे. अमन विधाते यांनी हे पेन साकारले आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचे भव्य पुतळे आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे बोधचिन्ह रसिकांचे लक्ष वेधून घेणारे आहे. मुख्य मंडपातील व्यासपीठावर दोन्ही बाजूला पुस्तकांचे रॅक्स आणि पुस्तकाचे वाचन करणारे आचार्य अत्रे व पु. ल. देशपांडे यांच्या वैविध्यपूर्ण प्रतिकृती रसिकांना सहजगत्या दिसतील. मंचावरील उपस्थितांचे सुस्पष्टपणे दर्शन घेण्यासाठी १२०० फुटांचा भव्य एलईडी पडदा लावण्यात आला आहे. तर, मंडपामध्ये १३ मोठय़ा आकारातील एलईडी स्क्रीनच्या उभारणीचे कामही पूर्ण झाले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी दिली.
संमेलनाला येणाऱ्या साहित्य रसिकांना संमेलनालगत असलेल्या १०० एकरच्या मैदानावर वाहने लावण्याची सोय करण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी आणि बस लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ही जागाही अपुरी पडली तर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील अभियांत्रिकीचा वाहनतळही रसिकांसाठी खुला करण्यात आला आहे. संमेलनस्थळी पोलीस उपायुक्त, एक सहायक पोलीस आयुक्त, सात पोलीस निरीक्षक, ३५ पोलीस उपनिरीक्षक, २५० पुरुष आणि ५० महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याखेरीज दोनशे खासगी सुरक्षारक्षक (बाऊन्सर्स) संमेलननगरीमध्ये असतील.
काँग्रेस भवन, येरवडा, मोशी, देहू, आळंदी, तळेगाव, रावेत आणि मुळशी येथून संमेलनातील कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ इच्छिणाऱ्यांना संमेलन स्थळापर्यंत नेऊन सोडण्यासाठी मोफत बससेवेची व्यवस्था संयोजकांनी केली आहे. शनिवारपासून (१६ जानेवारी) तीन दिवस दररोज सकाळी आठ वाजता बस सुटणार आहे.
ही आहेत वैशिष्टय़े
– १५ हजार रसिकांना बसता येईल असा मुख्य मंडप
– १२० फूट लांबीचे द्विस्तरीय व्यासपीठ
– व्यासपीठावर दोनशे तर, मंडपामध्ये बाराशे एलईडी दिव्यांचा प्रकाश
– अडीच हजार आसनक्षमतेचे दोन उपमंडप
– चारशे गाळ्यांचा समावेश असलेली ग्रंथनगरी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा