ढोल-ताशांच्या निनादात गणरायाचे स्वागत; मानाच्या गणपतींची मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठापना
नावीन्यपूर्ण तालांसह झालेले बहारदार ढोल-ताशावादन..या तालावर भगवा ध्वज नाचविणारे युवक.. रस्त्याच्या कडेला उभे राहणाऱ्या नागरिकांनीही नकळतपणे तालावर थिरकण्याचा लुटलेला आनंद.. आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथामध्ये विराजमान झालेली गणरायाची मूर्ती.. ‘गणपती बाप्पा मोरया’चा होणारा गजर आणि ढोल-ताशांच्या निनादात निघालेल्या मिरवणुकांद्वारे गणरायाच्या आनंद पर्वणीला गुरुवारी आरंभ झाला. मानाच्या गणपतींची मुहूर्तावर विधिवत पूजा होऊन प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सव पूर्तीचे वर्ष असल्यामुळे या वर्षी वेगळाच थाट अनुभवावयास मिळाला. घरोघरी षोडशोपचार पूजनाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेसाठी पहाटेपासूनच मुहूर्त असल्याने अनेकांनी बुधवारी सायंकाळनंतरच गणरायाची मूर्ती घरी आणून ठेवली होती. तर, काहींनी गुरुवारी सकाळी गणेश मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठापना केली.
कसबा गणपती मंडळ
पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना गुरुवारी सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या हस्ते झाली. प्रतिष्ठापनेपूर्वी उत्सव मंडपातून ८.३० वाजता मिरवणूक निघाली. हमालवाडा येथून मूर्तिकार नीलेश पार्सेकर यांच्याकडून मूर्ती घेतल्यानंतर मिरवणूक पुन्हा उत्सव मंडपात आली.
तांबडी जोगेश्वरी मंडळ
ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंडळ या मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक सकाळी १० वाजता उत्सव मंडपातून निघाली. न्यू गंधर्व बँडपथक, शिवमुद्रा आणि ताल ही ढोल-ताशापथके मिरवणुकीच्या अग्रभागी होती. बांधकाम व्यावसायिक अमोल रावेतकर यांच्या हस्ते १२ वाजता गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली.
गुरुजी तालीम मंडळ
मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळातर्फे यंदा साकारण्यात आलेल्या काल्पनिक गणेश महालामध्ये उद्योजक आदित्य शर्मा आणि अर्चना शर्मा यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापूर्वी सुभाष सरपाले यांनी सजविलेल्या फुलांच्या रथातून दहा वाजता निघालेल्या मिरवणुकीत नादब्रह्म, गर्जना, शिवरूद्र, गुरुजी प्रतिष्ठान ही ढोल-ताशा पथके सहभागी झाली होती.
तुळशीबाग मंडळ
अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते तुळशीबाग मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची दुपारी १२.३० वाजता प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यापूर्वी गणपती चौक येथून सकाळी ९.३० वाजता सुरू झालल्या मिरवणुकीमध्ये लोणकर बंधू यांचा नगारखाना, स्वामी प्रतिष्ठान, उगम आणि गजर ही तीन ढोल-ताशा पथके सहभागी झाली होती.
केसरीवाडा गणेशोत्सव</strong>
केसरीवाडा गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला सकाळी १० वाजता रमणबाग चौकातून सुरूवात झाली. श्रीराम, शिवमुद्रा ही ढोल-ताशा पथके सहभागी झाली होती. रोहित टिळक यांच्या हस्ते ११.३० वाजता गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना देहू संस्थानचे विश्वस्त बाळासाहेब मोरे आणि रामपल्ली यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता झाली. त्यापूर्वी ८.३० वाजता ट्रस्टच्या पारंपरिक रथातून मिरवणुकीला सुरुवात झाली. खळदकर यांचे नगारावादन, श्रीराम, विश्वगर्जना, तालगर्जना आणि श्री शिवाजी मर्दानी पथक ही ढोल-ताशापथके सहभागी झाली होती.
अखिल मंडई मंडळ
काल्पनिक राजस्थानी गजराज महालामध्ये अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते सकाळी ११. ३० वाजता झाली. त्यापूर्वी मंडळाच्या समाज मंदिरापासून मिरवणूक निघालेल्या मिरवणुकीत न्यू गंधर्व बँडपथक, नूमवि वाद्यपथक आणि शिवगर्जना पथक सहभागी झाले होते.
दगडूशेठ हलवाई गणपती
पुष्परथातून निघालेल्या मिरवणुकीनंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणरायाची सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी धुंडिराज पाठक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना झाली. तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिरात गणपती विराजमान झाले . मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता मिरवणूक निघाली. सार्वजनिक गणेश मंडळातील महागणपती असा लौकिक असलेल्या श्री तुळशीबाग मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.