जेजुरी : साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत गुरुवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे भंडारा उधळून स्वागत करण्यात आले. संत सोपानकाकांच्या सासवड नगरीतून गुरुवारी सकाळी साडेसात वाजता पालखी सोहळ्याने जेजुरीकडे येण्यासाठी मार्गक्रमण केले.

बोरावके मळ्यात सकाळची न्याहारी आणि यमाई शिवरीत भोजन उरकून पालखी सोहळ्याने सासवड ते जेजुरी हा १७ किलोमीटरचा टप्पा पार केला. पालखी सोहळा जेजुरीजवळ आल्यावर लांबून खंडोबाचा गड दिसू लागला. त्यावेळी पालखी रथाच्या पुढे-मागे असणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांनी गाणी, अभंग, भारुडे म्हणत मल्हारी वारी मागितली. जेजुरीचा खंडोबा आणि पंढरीचा विठोबा या दोन्ही दैवतांच्या भक्तिरसात सारेजण न्हाऊन निघाले.

आणखी वाचा-पुणे : तत्कालीन शिक्षण उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा, बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचे प्रकरण

पालखी सोहळ्याने सायंकाळी पाच वाजता जेजुरी नगरीत प्रवेश केल्यानंतर खंडोबा देवस्थान आणि जेजुरी नगरपालिकेच्या वतीने रथावर भंडाऱ्याची उधळण करीत स्वागत करण्यात आले. जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदाडे, विश्वस्त मंगेश घोणे, ॲड. पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड. विश्वास पानसे, पोपट खोमणे, अभिजित देवकते, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, वीणा सोनवणे, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे विजय कोलते उपस्थित होते. ऐतिहासिक होळकर तलावाकाठी असलेल्या पालखी तळावर समाज आरती करण्यात आली. आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त ॲड राजेंद्र उमप, विश्वस्त योगी निरंजन नाथ, भावार्थ देखणे उपस्थित होते.

आणखी वाचा-आळंदी: महाविकास आघाडीच इंद्रायणी बचाव एल्गार; दिला ‘भाजप हटाव, इंद्रायणी बचाव’ चा नारा..

गावामध्ये चिंचेची बाग, छत्री मंदिर, लवथळेश्वर, औद्योगिक वसाहत येथे तंबू उभारून वारकरी दिंड्या उतरल्या होत्या. सर्व भागामध्ये नगरपरिषदेतर्फे पुरेसा पाणीपुरवठा करण्यात आला होता. विविध संस्था, गणेश मंडळांच्या वतीने वारकरी बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. शुक्रवारी (५ जुलै) सकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळा महर्षी वाल्मिक ऋषींच्या वाल्हे गावाकडे मार्गस्थ होणार आहे. हजारो भाविकांनी खंडोबा गडावर जाऊन देवदर्शनाचा लाभ घेतला.