मकरंद रानडे आणि विश्वजित वैद्य या बालपणीच्या मित्रांनी काही वर्षे नोकरी केल्यानंतर काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने सुपारीच्या पानांपासून विविध उत्पादने तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. सुपारीच्या पानांपासून तयार होणारी ताट, वाटय़ा, डिश ही उत्पादने प्लास्टिकला उत्तम पर्याय आहेत आणि ती शंभर टक्के पर्यावरणपूरक आहेत. वापरून झाल्यानंतर पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता नष्ट होणाऱ्या या उत्पादनांबाबत सामान्य नागरिकांना फारशी माहिती नसल्याने या दोघांना व्यवसायात अडचणीही आल्या. त्यावर मात करत अवघ्या दीड वर्षांत पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबईपर्यंत या दोघांनी व्यवसायाचे विक्रीक्षेत्र विस्तारले आहे.
वेस्टकोस्ट इको प्रॉडक्ट्स कंपनीची स्थापना मकरंद रानडे आणि विश्वजित वैद्य यांनी १५ ऑगस्ट २०१६ रोजी केली. मकरंद आणि विश्वजित हे दोघेही बालपणीचे मित्र आहेत. चोवीस वर्षे खासगी कंपनीत नोकरी केल्यानंतर व्यवसाय किंवा वेगळे काहीतरी करायचे, असे मकरंद यांनी ठरवले होते. ओळखीच्या एका व्यक्तीकडून सुपारीच्या पानापासून तयार होणाऱ्या उत्पादनांची कल्पना त्यांना समजली. त्यानंतर मकरंद आणि विश्वजित यांनी मिळून हा व्यवसाय, त्याची बाजारपेठ यांचा अभ्यास केला आणि पुढे व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला काही दिवस नोकरी सांभाळत व्यवसाय केला. उत्पादनांना मागणी वाढल्यानंतर व्यवसायात जम बसला आणि दोघांनीही नोकरी सोडून पूर्णपणे व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मोठय़ा ताटापासून चमच्यापर्यंत अशी एकूण सात प्रकारची उत्पादने सुपारीच्या पानापासून घेतली जातात. त्यामध्ये बारा इंची ताट, दहा इंची प्लेट, आठ इंची प्लेट, नाश्त्यासाठीची प्लेट, द्रोण आणि चमचा अशी उत्पादने आहेत.
कंपनीचा सुरुवातीला पुण्यातील डोणजे येथे कारखाना होता. तो आता हरिहरेश्वर येथे स्थलांतरित करण्यात आला आहे. ताटे, द्रोण आदी उत्पादने होतील तशी ती पुण्यात टेम्पोमधून आणली जातात आणि घाऊक तसेच किरकोळ विक्रेत्यांकडे विक्रीसाठी दिली जातात. व्यवसाय सुरू करण्यात आला तेव्हापासूनच सुपारीची पाने हरिहरेश्वरमधून आणली जातात. हरिहरेश्वर ते पुणे हे अंतर १७० कि.मी. आहे. त्यामध्ये अनेकवेळा ही पाने साठवून त्यापासून उत्पादने करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत पाने खराब होऊन वाया जात असत. त्यामुळे डोणजे येथील उत्पादन कारखाना हरिहरेश्वर येथे किरण वाकणकर यांच्याकडे स्थलांतरित करण्यात आला.
मकरंद रानडे यांनी व्यवसाय सुरू केला तेव्हा सुपारीच्या पानांपासून ताट, वाटय़ा तयार होऊ शकतात, हेच मुळात अनेकांना माहिती नव्हते. हा प्लास्टिकला चांगला आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे, याबाबत लोकांमध्ये जागृती होत असून या उत्पादनांना मागणी वाढत आहे. सुरुवातीला मकरंद आणि विश्वजित यांनी स्वत: सुपारीची पाने गोळा करून त्यांच्यावर प्रक्रिया करून उत्पादने तयार केली. उत्पादनांची गुणवत्ता अत्यंत उच्चप्रतीची आहे. त्यामुळे प्लास्टिकची उत्पादने विकणाऱ्या घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांकडे संपर्क केल्यानंतर त्यांनादेखील ही संकल्पना आवडली आणि कंपनीची उत्पादने त्यांच्याकडे विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात झाली. कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्येही सुपारीचे मोठे उत्पादन होते. त्यामुळे सुरुवातीला कर्नाटक, केरळमधून सुपारीची पाने मागवण्यात आली होती, परंतु त्यांची गुणवत्ता कमी दर्जाची असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील सुपारीची पाने घेणे बंद करण्यात आले.
कंपनीचे वैशिष्टय़ म्हणजे सुपारीच्या झाडावरून गळून पडलेली पाने उत्पादनांसाठी वापरली जातात. झाडांवरून ओरबाडून पाने काढली जात नाहीत. त्यामुळे निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी आमच्याकडून पोहोचवली जात नाही. सुपारीचे मोठे पान दोन फुटांपर्यंत लांब असते. पाने गोळा करण्यासाठी कामगार नेमले आहेत. हरिहरेश्वर येथील कारखान्यात परिसरातील शेतातून पाने गोळा केली जातात. ज्यांच्या शेतातून पाने गोळा केली जातात, त्यांना प्रतिपान पैसे दिले जातात. यंत्रात टाकल्यानंतर एकावेळी ताट, द्रोण अशाप्रकारे दोन उत्पादने तयार होतात. त्याआधी पाने गोळा केल्यानंतर ती वेगळी करून स्वच्छ केली जातात. हरिहरेश्वर येथील कारखान्यात ताट, द्रोण, प्लेट आदी उत्पादने तयार करण्यासाठी चार महिला कर्मचारी आणि एका पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती मकरंद यांनी दिली.
मागणी वाढत जाऊन आता पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई येथे कंपनीची उत्पादने विकली जातात. तसेच कंपनीने ‘वेस्टकोस्ट इको डॉट को डॉट इन’ नावाचे स्वत:चे संकेतस्थळ २०१७ मध्ये तयार केले आहे. याबरोबरच फेसबुक पेज तयार केले असून इंडिया मार्टबरोबरही कंपनी जोडली गेली आहे. अशा विविध माध्यमांतून कंपनीच्या उत्पादनांना मागणी आहे. उत्पादनांना मागणी वाढल्यानंतर मकरंद यांच्या दापोलीपासून दाभोळपर्यंतच्या तीन मित्रांनीही सुपारीच्या पानांपासून उत्पादने तयार करण्याची यंत्रे घेतली असून तेदेखील कंपनीकडेच आपली उत्पादने पाठवून देतात. सहा रुपयांपासून उत्पादनांची किंमत आहे. प्रत्येक उत्पादनाचा पंचवीसचा सेट करून त्याची विक्री केली जाते. मकरंद आणि विश्वजित यांच्याबरोबरीने चालू वर्षांत पराग बोरकर हेदेखील भागीदार झाले आहेत.
सुपारीच्या पानांपासून तयार केलेल्या उत्पादनांचे वैशिष्टय़ म्हणजे ही उत्पादने वापरून झाल्यानंतर खड्डा करून त्यामध्ये पुरल्यास त्यापासून खत तयार होते. झाडाचा भाग असल्याने शंभर टक्के जळून जातात किंवा गाई, गुरांना खायलाही देता येतात. त्यामुळे या उत्पादनांपासून प्लास्टिकप्रमाणे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. तसेच उत्पादने तयार करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन वापरले जात नाही, संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने ती तयार केली जातात. सर्वसामान्य लोकांच्या घरांपर्यंत आपली उत्पादने जायला हवीत, हाच उद्देश ठेवून व्यवसायाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्यांचा अभ्यास करून परवडणाऱ्या दरांत उत्पादने देण्याचा मानस आहे. अनेक लोक दुकानांमध्ये जाऊन आमची उत्पादने खरेदी करतात. त्यामुळे दुकानदार विक्री करताना त्यांचा हिस्सा घेऊन विक्री करतात. त्यामुळे थेट आमच्याकडून खरेदी केल्यास सामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात उत्पादने मिळू शकतील, असेही मकरंद सांगतात.
prathamesh.godbole@expressindia.com