शहरातील हॉटेलांमध्ये जो ओला कचरा निर्माण होतो तसेच जे अन्नपदार्थ शिल्लक राहतात ते कंटेनरमध्ये न टाकता हॉटेलचालकांनी जवळच्या बायोगॅस प्रकल्पात द्यावेत. तसेच तारांकित हॉटेलमधील ओला कचरा हॉटेल परिसरातच जिरवावा, असे आदेश महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी शनिवारी दिले.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे आयोजित बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिले. बैठकीत शहरातील स्वच्छताविषयक कामांचा आढावा घेण्यात आला. घनकचरा विभागातील अधिकारी, सर्व क्षेत्रीय अधिकारी, अन्य संबंधित अधिकारी आणि स्वच्छ संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. स्वच्छताविषयक कामांचा आढावा सादर झाल्यानंतर आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कचरा वर्गीकरण तसेच अन्य कामांबाबतचे आदेश दिले.
हॉटेलचालकांचा ओला कचरा कंटनरमध्ये येणार नाही, याबाबत दक्षता घेतली जावी तसेच तो बायोगॅस प्रकल्पात नेण्याची जबाबदारीही चालकांवर द्यावी, असे आयुक्तांनी सांगितले. शहरातील नाले सफाईची कामे प्राधान्याने झाली पाहिजेत, असे सांगून आयुक्त म्हणाले की, घंटागाडीद्वारे कचरा संकलन केले जाते तेथील कर्मचाऱ्यांवर योग्यरीत्या नियंत्रण ठेवणेही आवश्यक आहे, तसेच परवानगी न घेता अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
हडपसर येथील प्रकल्पावर वर्गीकरण केलेला सुका कचरा पाठवावा, तसेच स्वच्छ संस्थेच्या सेवकांना मागणीनुसार कचरा गाडी, चप्पल, बादल्या, साबण आदी साधने पुरवली जावीत, कचरा वेचणारे सेवक, सोसायटय़ांचे सभासद, वसाहतींमधील नागरिक यांच्या बैठका आयोजित कराव्यात असेही आयुक्तांनी सांगितले.
सोसायटय़ांना नोटीसा द्या
अनेक सोसायटय़ांनील गांडूळखत प्रकल्प सुरू केले आहेत. मात्र अनेक सोसायटय़ांमधील गांडूळखत प्रकल्प बंद असून ज्या ठिकाणचे प्रकल्प बंद पडले आहेत, त्या सोसायटय़ांना नोटीसा द्या, असाही आदेश आयुक्तांना यावेळी दिला.
हॉटेलांमधील ओला कचरा बायोगॅस प्रकल्पाला देणे सक्तीचे
हॉटेलचालकांचा ओला कचरा कंटनरमध्ये येणार नाही, याबाबत दक्षता घेतली जावी तसेच तो बायोगॅस प्रकल्पात नेण्याची जबाबदारीही चालकांवर द्यावी, असे आयुक्तांनी सांगितले.
First published on: 16-06-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wet waste in hotels is now compulsory to be used for bio gas project