जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे देहू परिसरातील भंडारा डोंगर येथे भव्यदिव्य असे मंदिर बांधण्यात येत आहे. तुकोबांच्या आणि अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या श्रीरामाच्या मंदिरात अनेक समानता आहेत. दोन्ही मंदिराला एकाच खाणीतील दगड वापरण्यात येत आहे. मंदिर वास्तुशास्त्र देखील एकच आहे. तसेच, कामगार, आर्किटेक्ट हे देखील दोन्ही मंदिराला एकाच ठिकाणचे आहेत हे विशेष. तुकोबांचे मंदिर हे लोकवर्गणीतून उभा राहात असून २०२५ पर्यंत हे बांधकाम पूर्ण करण्याचा मानस आहे अशी माहिती भंडारा डोंगरचे ट्रस्टी बाळासाहेब काशीद यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भंडारा डोंगरावर असलेल्या सात एकर परिसरातील २५ गुंठ्यांत तुकोबांचे भव्यदिव्य मंदिर बांधण्यात येत आहे. २५ हजार स्केअर फूटचे मंदिर असेल. मंदिराचे बांधकाम दगडात होणार आहे. जे अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र यांचं मंदिर बांधत आहेत तेच आर्किटेक्ट – कॉट्रक्टर जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिर बांधत आहेत. १०८ फुटांचे तीन कळस या मंदिरावर असतील. छोटे- मोठे २५ कळस, २२ मूर्ती घडवणार आहोत. तुकोबांच्या जीवनातील दहा प्रसंग मंदिरात दगडी कोरीव काम करून दाखवण्यात येणार आहेत. मंदिराला नऊ दरवाजे असतील याशिवाय सात ते आठ खिडक्या असतील. ज्या खाणीतून रामाच्या मंदिरासाठी दगड येत आहे त्याच खाणीतून तुकोबांच्या मंदिरासाठी दगड येतो आहे. दोन वर्षात हे मंदिर पूर्ण होण्याचा मानस आहे. लोकवर्गणीतून हे मंदिर आम्ही उभारत आहोत ” अशी माहिती ट्रस्टी बाळासाहेब यांनी दिली. नागरिकांनी यासाठी आर्थिक मदत करून हातभार लावावा असे आवाहन देखील काशीद यांनी केले आहे.

हेही वाचा… पुणे: कचरामुक्त गाव मोहिमेंतर्गत १२५ टन कचऱ्याचे संकलन

“श्रीराम आणि तुकोबांच्या मंदिरात अनेक साम्य आहेत. राजस्थान येथील खाणीतून दोन्ही मंदिराला दगड वापरण्यात येत आहेत.हा दगड १५०० वर्ष राहतो. लाल आणि पांढरा दगड वापरला जातो आहे. दोन्ही मंदिरे नागर शैलीत उभारण्यात येत आहेत” अशी माहिती मंदिर वास्तुविशारद मानशंकर सोमपुरा यांनी दिली.

हेही वाचा… पुणे: सिंहगड निवासस्थान भाडेतत्त्वावर देण्यासाठी ‘एमटीडीसी’कडून निविदा

तुकोबांच्या मंदिराची वैशिष्ट्ये…

गुजरातमधील अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारलं जात आहे.
मंदिराची लांबी १७९ फूट, उंची १०८ फूट तर रुंदी १९३ फूट इतकी भव्य आहे.
मंदिराला तीन भव्य कळस असतील.
मंदिराचा कळस ८७ ते ९६ फूट इतकं दिव्य असेल.
मंदिराच्या मंडपाची शोभा वाढवणारा घुमट हा ३४ फूट बाय ३४ फुटांचा असेल.
गर्भगृह १३.५ फूट बाय १३.५ फूट असेल.
मंदिराला नऊ दरवाजे तसेच गर्भगृहाला पाच दरवाजे आणि सहा खिडक्या आहेत.
मंदिरात मुख्य जागेवर विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची आणि त्यांना पाहण्यात मग्न असणारे संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल.
२५ हजार स्क्वेअर फुटांत १२२ खांबावर (पिलर) हे भव्य दिव्य मंदिर उभं राहणार आहे.
अंदाजे १५० कोटींचा याला खर्च येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the similarities between tukoba mandir at bhandara hill near dehu and ayodhya ram mandir kjp 91 asj