पुणे : पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे २४ संशयित रुग्ण आढळले आहेत. नेमका कशामुळे हा दुर्मीळ विकाराची रुग्णसंख्या वाढली, असा प्रश्न निर्माण झाला होता. आता काही रुग्णांच्या तपासणीत कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू संसर्ग समोर आला आहे. न्यूरॉलॉजिकल सोसायटी ऑफ पुणे या संस्थेने या संसर्गासाठी दूषित पाणी आणि अन्न कारणीभूत असल्याकडे बोट दाखविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २४ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील ५ पुणे महापालिकेच्या हद्दीतील आहेत. याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील २, ग्रामीण भागातील १६ आणि जिल्ह्याबाहेरील १ रुग्ण आहे. यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सर्वाधिक १० रुग्ण दाखल असून, पूना हॉस्पिटल ५, काशीबाई नवले रुग्णालय ४, भारती रुग्णालय ३, सह्याद्री हॉस्पिटल (डेक्कन) आणि अंकुरा हॉस्पिटल (औंध) येथे प्रत्येकी १ असे रुग्ण दाखल आहेत. यातील काशीबाई नवले रुग्णालयातील १ आणि भारती रुग्णालयातील १ असे एकूण २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याचबरोबर ८ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>>‘स्मार्ट कार्ड’विना ‘एसटी’ प्रवास अडचणीचा

पूना हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांच्या तपासणीत कॅम्पायलोबॅक्टर हा जीवाणू आढळून आला आहे. याबाबत न्यूरॉलॉजिकल सोसायटी ऑफ पुणेचे अध्यक्ष डॉ. राहुल कुलकर्णी म्हणाले की, काही रुग्णांच्या तपासणीत कॅम्पायलोबॅक्टर संसर्ग आढळून आला आहे. हा जीवाणू दूषित पाणी अथवा अन्नातून मानवाच्या शरीरात प्रवेश करतो. या जीवाणू संसर्गामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोमची बाधा होते. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून पाणी आणि बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. हा आजार योग्य उपचाराने बरा होत असल्याने त्याबाबत विनाकारण घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.

हेही वाचा >>>डंपरच्या धडकेत युवतीचा मृत्यू; बाणेर भागात अपघात, दुचाकीस्वार महिला जखमी

महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे म्हणाल्या, की गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या ८ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. हे तपासणी अहवाल हाती आल्यानंतर रुग्णांचा आजार स्पष्ट होईल. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या परिसरात इतर व्यक्तींमध्ये सारखी लक्षणे दिसून येत आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. याचबरोबर रुग्णांनी अलीकडच्या काळात प्रवास केला होता का, याचीही माहिती घेण्यात येत आहे. रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

कॅम्पायलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे

– अतिसार

– पोटदुखी 

– ताप

– मळमळ अथवा उलट्या

नेमका आजार काय?

गुईलेन बॅरे सिंड्रोम हा चेतासंस्थेशी निगडित दुर्मीळ विकार आहे. जगभरात दर १ लाख लोकसंख्येमागे एका व्यक्तीला हा आजार जडतो. हा आजार सर्वच वयोगटांतील व्यक्तींना होतो. या आजारात रुग्णाची प्रतिकारशक्ती त्याच्या चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे रुग्णाला स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येत नाही. याचबरोबर रुग्णाच्या संवेदना बधिर होऊन तापमान आणि स्पर्शसंवेदना जाणवत नाहीत. ही लक्षणे काही आठवडे राहतात. अनेक रुग्ण हे दीर्घकालीन गुंतागुंत न होता या आजारातून बरे होतात. काही रुग्णांना मात्र या आजारातून बरे झाल्यानंतरही काही काळ अशक्तपणा जाणवतो.

आजार कशामुळे होतो?

गुईलेन बॅरे सिंड्रोम हा आजार नेमका कशामुळे होतो हे अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. अनेक वेळा विषाणू अथवा जीवाणू संसर्गानंतर या आजाराचा प्रादुर्भाव होतो आणि रुग्णाची प्रतिकारशक्तीच त्याच्या शरीरावर हल्ला करते. कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी या जीवाणूमुळे हा आजार होण्याचा धोका अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. यात उलट्या, जुलाब अशी लक्षणे दिसून येतात. फ्लू अथवा सायटोनेगालोव्हायरस, एपस्टाईन-बार विषाणू आणि झिका विषाणूच्या संसर्गानंतरही हा आजार होतो. फ्लूच्या लसीमुळेही काहींना हा आजार झाल्याचे समोर आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What causes the rare disorder guillain barre syndrome to occur in pune print news stj 05 amy