डॉ. अजय जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Loksatta Pune Vardhapan 2023 : नाटक हा पुण्यातील अविभाज्य कलाप्रकार. एकांकिका स्पर्धांपासून नावीन्यपूर्ण प्रयोगांपर्यंत अनेकविध प्रयोग नाट्यकर्मी सातत्यानं करत असतात. या प्रयोगांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली आणि जाते. नाट्यवारीची पताका नव्या पिढीचे नाट्यकर्मी जोमानं पुढे नेताना दिसत आहेत. मात्र काळानुरूप बदलत्या पुण्यासह नाटकात काय बदल व्हायला हवेत, भविष्यातील नाटक कसं असायला हवं याचा घेतलेला वेध…

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : नव्या पुण्यासाठी द्रष्टे सुनियोजन व अंमलबजावणीची गरज…

पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असं संबोधलं जातं. अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक घडामोडींची साक्षीदार आहे ही पुण्यनगरी. याच बदलत्या प्रवासात, एक महत्त्वाचा धागा, ज्यानं एक सुंदर झालर विणली, तो म्हणजे मराठी नाटक. मराठी नाटकांची परंपरा ही विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या ‘तृतीय रत्न’ यांपासून सुरू झाली असं गृहीत धरलं, तरीही त्याआधी लोककलेची परंपरा प्रचलित होतीच. १८४३ ते १९४३ या मोठ्या कालखंडात संगीत नाटके, त्याचबरोबर फारसी-ऊर्दू- गुजराथी शैलीचा प्रभाव आणि मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यामुळे, इंग्रजी साहित्य आणि नाटके उपलब्ध झाली. या सगळ्या बदलांचा मराठी नाटकांवर लक्षणीय प्रभाव पडला, जेणेकरून मराठी नाटकांच्या परंपरेला पुढे नेण्यात मदत झाली. त्यानंतर एकोणीसशे साठ नंतरची आधुनिक नाट्यचळवळ, त्याचबरोबर चित्रपटाच्या आगमनामुळे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि पडद्यामागचे कलाकार यांची एक मोठी फळी तयार झाली. या काळात काही लक्षवेधी नाटके, निरनिराळे आकृतिबंध, प्रस्तुतिकरणाचे नमुने इ. बघायला मिळाले. त्याशिवाय कलाकारांचे संच नाटकांबरोबर दूरचित्रवाणी आणि चित्रपटाच्या पडद्यांवरही झळकले. मराठी नाटक महाराष्ट्रापुरतेच नाही, तर भारतभर आणि परदेशीसुद्धा पोहोचले.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणेरी सांस्कृतिकपण

या सगळ्या प्रवासात अनेक महत्त्वाचे पैलू आहेत, जे सविस्तर मांडता येतील. पण त्यासाठी वेगळा लेख लिहावा लागेल. मात्र इथे एक बाब मांडणं महत्त्वाचं आहे, ती म्हणजे करोनाचा काळ आणि त्यानंतरची नाट्यसृष्टी, ज्यामुळे या प्रदीर्घ नाट्यपरंपरेला अनेक बाजूंनी कलाटणी मिळाली. करोनाच्या गेल्या दोनेक वर्षांत काळजी आणि चर्चा होती नाटकांच्या भविष्याबद्दल. पण त्यातूनही आपण बाहेर पडलो आणि आज नाटक तितक्याच जोमाने चालले आहे, असे दिसून येते. या १८० वर्षांपेक्षा जास्त काळाच्या नाट्यपरंपरेबरोबर, प्रेक्षकांची एक फळीसुद्धा तयार होत गेली. करमणुकीची इतर माध्यमे उपलब्ध झाली असली, तरी मराठी माणूस नाटकांपासून दूर गेला नाही ही बाब आजही प्रखरतेने दिसून येते. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांबरोबर नाटकाचा अवकाशसुद्धा बदलत गेला. पूर्वी प्रोसेनियम आर्च किंवा बॉक्स सेटमध्ये बसणारी नाटके होती, त्याच बरोबरीने पर्यायी जागांचा (अल्टनेट स्पेसेस) वापर झाला हे इतिहासातून दिसून येते. तसेच सध्या नाटके वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्याचे बघायला मिळते. त्यात ब्लॅक बॉक्स थिएटरपासून शाळा, लोकांच्या घरातील हॉल, गच्ची, कम्युनिटी हॉल अशा जागा वापरल्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे, तर एकाच ठिकाणी दोन-तीन जागा उपलब्ध आहेत आणि तीनही ठिकाणी प्रेक्षक असतात. सादरीकरणाचा अवकाशसुद्धा भिन्न रचनेत दिसून येतो. त्यामुळे प्रेक्षक-कलाकार यांची रचना बदलते. तर एकंदरीत नाटकांना उत्तम दिवस आले नसले, तरी बऱ्यापैकी नाटके आणि त्यासाठी जाणारा प्रेक्षक ही सध्याची स्थिती नाकारता येणार नाही.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : भविष्यवेधी शिक्षण व्यवस्था

पुण्यात व्यावसायिक नाटके, समांतर नाटक आणि अ-मराठी नाटक असे मला तीन वेगवेगळे असे भाग पडलेले दिसतात आणि प्रत्येकाचा प्रेक्षक बऱ्याच प्रमाणात वेगवेगळा आहे. पण खंत याची वाटते, की या तीनही प्रकारांत देवाणघेवाण फार नाही. काही अपवाद वगळता, हे प्रवाह स्वतंत्रपणे जगत आहेत असे वाटते. तरीही नाटक बघण्याची ओढ कमी झालेली आहे, करोनानंतर किंवा इतर माध्यमांमुळे असे घडलेले नाही. ही चांगलीच गोष्ट आहे. दुसरी एक बाब इथे नमूद करू इच्छितो आणि माझ्या मते ती महत्त्वाची आहे. जसे नाटकांचेही मराठी संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे, तसाच नृत्य, संगीत, चित्रकला, फाइन आर्टस, दृश्यकला इतर कलांचा पुण्यात वावर मोठा आहे. मात्र या कलांमध्ये देवाणघेवाण फार दुर्मिळ आहे. कलाकार एकमेकांचे सादरीकरण पाहायला गेलेले दिसत नाहीत. तसेच पुण्यात अ-मराठी, हिंदी, बंगाली, इंग्लिश नाटक करणारी मंडळीही आहेत. पण सगळेच आपापल्या बेटांवर काम करताना दिसतात आणि आश्चर्याची गोष्ट अशी, की त्यांनीसुद्धा आपापला प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. मात्र हे कलाकार वेगळ्या भाषेतील नाटक बघण्याचा प्रयास करीत नाहीत. त्यामुळे एकमेकांची ओळखसुद्धा नसते.

पुणे झपाट्याने वाढत आहे. एकेकाळी मुंबईला जाताना, शहरापासून काही अंतरावर शेतजमीन सुरू व्हायची. आता मोठमोठ्या इमारती चारी बाजूंनी उभ्याआडव्या पसरलेल्या आहेत. नोकरीच्या कारणाने आलेले परप्रांतीय, अ-मराठी भाषिक लोक, मोठ्या संख्येने येथे आहेत. ते स्वत:ची संस्कृती घेऊन आलेले आहेत. त्यांची भाषा, राहणी, साहित्य असे सगळेच निराळे आहे. पुण्याचा नाट्यविषयक भूगोल पाहिल्यास सर्व संस्कृतिकेंद्र, जुन्या पुण्याच्या आजूबाजूला स्थापित आहे. त्यामुळे दूर राहणारे अनेक लोक नाट्यगृहांपर्यंत पोचू शकत नाहीत. पुण्याच्या वेशींपर्यंत आणि नव्याने विकसित झालेल्या भागांत पर्यायी नाटक पोहोचण्याची गरज आहे आणि त्यासाठी इमारत बांधली पाहिजे असे मुळीच नाही. पण नाट्यसंस्थांनी त्या ठिकाणी जाऊन नाटक करायला पाहिजे. छोटेखानी जागा विकसित करून नियमितपणे कार्यक्रम केल्यास प्रेक्षकांना एक सवय लागेल. त्या लोकांपर्यंत पोहोचणे हे मेहनतीचे आणि नियोजनाचे काम असेल. अ-मराठी नाटकमंडळींशी समन्वय साधणे, त्यांना आपली नाटके पहायला प्रोत्साहित करणे आणि आपण त्यांची नाटके पाहणे, एकमेकांमधील संवादाची सुरुवात करणे, इतर कलांमध्ये रस घेणे आणि त्यांचा नाट्यचळवळीतील सहभाग वाढवणे, ‘कोलॅबोरेशन इन आर्ट्स’ला (विविध कला आणि कलाकार यांनी एकत्र येऊन सादर करणे) वाव मिळेल असे प्रकल्प आखणे, कोलॅबोरेटिव वर्कशॉप्स आणि चर्चांचे आयोजन करणे, असे अनेक प्रकल्प हाती घेता येतील. या सगळ्या उपक्रमांच्या दस्तीवेजीकरणासाठी जर्नल, मासिक, संकेतस्थळ अशा स्वरूपात एक हक्काची जागा निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : भविष्यातील पुणे !

लोकसंख्येबरोबरच पुण्यातील वाहतूक कोंडीही वाढली आहे. त्यामुळे मध्य पुण्यात नाटक पाहायला येणे अवघड आहे, पण आगामी काळात मेट्रोमुळे कदाचित ही अडचण दूर होईल अशी आशा आहे. जी मोठी नाट्यगृहे आहेत, त्यांना व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवणे, नवीन ब्लॅक बॉक्स थिएटर सुरू करणे, प्रोसेनियम थिएटरच्या बाहेर जाऊन पर्यायी जागांवर (अल्टरनेट स्पेसेस) प्रयोग सादर करणे, छोट्या छोट्या नाटक-कलाकारांच्या समूहांना मदत करून त्यांना प्रोत्साहित करणे, पुण्याबाहेरील नाटकमंडळींबरोबर जोडलं जाणं अशा अनेक गोष्टी अपेक्षित आहेत. तसं पाहिलं, तर या गोष्टी करणे अवघड नाही, फक्त कलाकारांनी आपापल्या कोशातून बाहेर येऊन नि:स्वार्थीपणे यात लक्ष घातल्यास ही गोष्ट होण्याजोगी आहे. आणि महत्त्वाचे असे, की या सगळ्या प्रयत्नांना आणि त्यांची दखल घेणारा मायबाप-आपला प्रेक्षक सतत पाठीशी राहणार आहे. इतकी वर्षे साथ दिली, पुढेही देईलच.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : भविष्यातील पुणे !

माझ्या अंदाजानुसार महाराष्ट्रात, भारतभरात सर्वात जास्त संख्येने नाटकांची निर्मिती होते. त्यात पुण्याचा मोठा वाटा आहे. पुणे झपाट्याने बदलत चालले आहे आणि त्याचबरोबर पुण्याची संस्कृतीही बदलती दिसेल. नाटक हा याच बदलाचा एक अविभाज्य भाग असणार आहे. त्यासाठी अनेक पावले उचलावी लागतील. कोलॅबोरेशन आणि नेटवर्किंग, काही दमदार नाट्य महोत्सव, शाळा आणि कॉलेजातल्या नाट्य प्रशिक्षणाला मजबूत करण्याचे प्रयत्न, फिल्म आर्काइव्हजसारखे आकर्षक नाट्यसंग्रहालय, जागतिक नाटके बघण्यासाठी लाइव्ह स्ट्रीमिंगचे नियोजन, एक परिपक्व असे डॉक्युमेंटेशन सेंटर, नाटकांपर्यंत प्रेक्षक येण्यापेक्षा प्रेक्षकांपर्यंत नाटक पोचण्याची तरतूद, नवीन छोटेखानी प्रयोग करण्यासाठी जागा, अनेक पातळ्यांवरचे ऑडिओव्हिज्युअल (दृकश्राव्य) दस्तावेजीकरण, मुलाखती, सर्व कलांमधले संभाषण वाढवण्यासाठी कार्यक्रम (इंटरडिसिप्लिनरी आर्ट एक्स्पीरियन्स), देवाणघेवाण आणि संवाद, शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्ती, एक सशक्त प्रेक्षकवर्ग तयार करणे आदींचा त्यात समावेश आहे. छोट्या छोट्या प्रयत्नांनी हे सुरू झालेही आहे. परंतु एकत्रितपणे त्याच्यामागे लागले, तर एक वेगळे बळ प्राप्त होईल. युरोपातील जागतिक प्रसिद्धी मिळवलेले ‘एडिंबरा फ्रिंज फेस्टिव्हल’सारखे काही उपक्रम आपल्याला पुण्यात करता येतील का, ज्यात एक संपूर्ण शहरच सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरील यजमान शहर होऊन शहरातील प्रत्येक व्यक्तीला, घराला आणि घटकाला नाट्यचळवळीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल आणि मग ही नाट्य मेजवानी केवळ माझी किंवा तुझी न राहता ‘आपली’ होऊन जाईल. हे नक्कीच अशक्य नाही.

(लेखक नाट्य अभ्यासक आहेत)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What changes should be made in the play dpj
Show comments