पिंपरी चिंचवड : काही जागा ठरवण्याबाबत विलंब लागतो. आघाडी असो किंवा महायुती, काही जागा निश्चित करण्यामध्ये उशीर लागत असतो. पण, लवकरच याबाबत निर्णय होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. पिंपरी- चिंचवडमध्ये थेरगाव येथे खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटेल, अशी मिश्किल टिप्पणीही अजित पवार यांनी केली. प्रवीण माने हा मूळचा माझाच कार्यकर्ता असल्याचं सांगत माने यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला अजित पवार यांनी एक प्रकारे दुजोराच दिला. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील सर्वजण घड्याळ धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हावरील उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करतील, असंही ते म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्तावर बोलताना त्यांचे बरेच दिवस घालमेल सुरू होती, आता त्यांना निर्णय घ्यावेसे वाटले असेल, असेही ते म्हणाले.