पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने महाविजय २०२४ अभियान सुरू केले आहे. महाराष्ट्रातून महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा मिळाव्यात, असा निर्धार केला आहे. युतीमध्ये मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी मावळच्या उमेदवाराबाबत युतीतील पक्ष ठरवतील. पक्ष सांगेल तसे आम्ही काम करणार असून लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी स्पष्ट केले.
मावळ लोकसभा प्रवास दौरा, घर चलो अभियानाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ११ ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येणार आहेत. आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, अमित गोरखे, सरचिटणीस नामदेव ढाके यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा – पुणे : पीएमपीच्या ताफ्यात येणार आणखी ३०० गाड्या
हेही वाचा – पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांची दसऱ्यापूर्वीच दिवाळी; ८.३३ टक्के बोनस जाहीर
जगताप म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असून विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्ष संवाद साधणार आहेत. यानंतर घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाच्या नऊ वर्षांतील लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यात येणार आहे.